कामगार आरोग्य तपासणी व उपचार योजना
रत्नागिरी, दि. 27 : बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार व कुटुंबांकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी “कामगार आरोग्य तपासणी व उपचार योजनेंतर्गत” मोफत मोबाईल मेडिकल युनिट (चालते फिरते अत्याधुनिक तपासणी क्लिनिक) चा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे, एच एच एल लाईफकेअर संस्थेचे प्रकल्प राज्य समन्वयक राहुल ढोकचौले, जिल्हा समन्वयक दुर्वेश खाके उपस्थित होते.
तपासणी ते उपचार योजनेंतर्गत सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार व कुटुंब यांची मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
कामगार व कुटुंब यांना मोबाईल मेडिकल युनिटद्वारे मोफत डॉक्टर तपासणी, मोफत औषधे वाटप, तसेच सर्व आजारांकरिता मोफत संलग्न रुग्णालयामध्ये भरती, उपचार व आवश्यक शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ही योजना जिल्ह्यातील २३ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार व कुटुंबांकरिता अतिशय लाभदायी ठरणार आहे.
