उरण (विठ्ठल ममताबादे ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरणचे आदर्श शिक्षिका प्रिया सुनील चौधरी यांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उरण बोकडविरा येथे द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनतर्फे रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध खेळ, मनोरंजन, साहसी स्पर्धाचा या महोत्सवात समावेश होता. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा कार्याचा गौरव करत द्रोणागिरी भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरव करण्यात आला आहे. या प्रसंगी आदर्श शिक्षिका प्रिया चौधरी यांना द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनचे संस्थापक महादेव घरत,राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वडील लखुजी जाधवराव यांचे वंशज ॲड रणजित जाधवराव,आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील, पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक शिवराज पार्टे, पोलादपूर क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष नीलेशदादा कोळसकर, नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे मामा स्वराज्याचे मामा सुभेदार शेलार मामा यांचे वंशज दीपक शेलार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळचे प्रमुख सरनौबत पिलाजी गोळे यांचे वंशज मनोहर गोळे, सुभेदार ज्योत्याजी केसरकर यांचे वंशज आदेश केसरकर, जेएनपीटी बंदर विभागाचे माजी ट्रस्टी एस सी मिश्रा, जेष्ठ साहित्यिक पुंडलिक म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली घरत,ब्रह्मा कुमारी उज्ज्वला दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रिया सुनील चौधरी यांनी रयत शिक्षण संस्थेत १९ वर्षे विदयार्थी घडवत असताना शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन करून नवनवीन उपक्रम राबविणे, अंत नसे अक्षराला, अंधश्रद्धा,प्लास्टीकचे दुष्परिणाम , स्वातंत्र्यवीर यशोगाथा, लेक वाचवा, नवनवीन गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून देणे, गरीब विद्यार्थीना शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च पुरविणे असे अनेक उपक्रम त्यांनी बनविले आहेत. त्यांनी स्वत:चा फुलराणी काव्यसंग्रह तयार केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत यापूर्वी २०१९ ला राज्य शासनातर्फे नवोपक्रम पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्यांना द्रोणागिरी भूषण हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. द्रोणागिरी भूषण हा पुरस्कार मिळाल्याने प्रिया सुनिल चौधरी यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
