बांगलादेशी/रोहिंग्या घुसखोरांना मालेगावात जन्म दाखला देऊन घोटाळा झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच दि. ८ जानेवारी रोजी एसआयटी गठीत केली आहे. असाच प्रकार रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमध्ये निदर्शनास आल्याने याही घटनेचा एसआयटी तपास होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी : कोरोना महामारीच्या काळात बांगलादेशमधील नागरिकाला बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण शहरानजीकच्या शिरगाव ग्रामपंचायतीला चांगलेच भोवणार असे दिसते आहे. या प्रकरणी कसून चौकशी सुरू असतानाच तत्कालीन ग्रामसेवकाच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्याकडून देण्यात आले आहेत.

कोरोना महामारीच्या काळात 2020 मध्ये शिरगाव ग्रामपंचायती बांगलादेश मधील नागरिकाची जन्मनोंद करून तसे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांच्या केलेल्या चौकशीत आढळून आले.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलिसांनी शिरगाव ग्रामपंचायतीला नोटीस पाठवून यासंदर्भात संबंधितांचे जबाब नोंदवले. स्थानिक पातळीवर देखील जिल्हा प्रशासनाकडून संबंधित ग्रामसेवकाला मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
