पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या कोकण रेल्वे विद्युतीकरणाचा ऑनलाईन राष्ट्रार्पण सोहळा

विद्युतीकरणामुळे रेल्वेचे वर्षाकाठी वाचणार 150 कोटी; कोकण रेल्वे होणार वेगवान
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गाचे 100 टक्के विद्युतीकरण मार्च महिन्यात पूर्ण झाले आहे. रोहा ते ठोकूर दरम्यानच्या 740 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरण झालेल्या कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा दि. 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 2 वा. 45 मिनिटांनी दृकश्राव्य माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रार्पण सोहळ्यानंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग प्रदूषणमक्त वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यासाठी रत्नागिरी, मडगाव तसेच उडूपी येथे इलेक्ट्रीक टॅ्रक्शनवरील रेल्वे गाड्यांना रिमोटद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
दि. 24 मार्च मार्च रोजी या मार्गाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्याकडून तपासणी करण्यात आली होती. त्या पाठोपाठ आता दि. 20 जूनपासून ‘कोरे’चा संपूर्ण विद्युतीकृत मार्ग राष्ट्राला समर्पित केला जात असून कोकण रेल्वेसाठी हे एक नवं पर्व सुरु होत असल्याचे मानले जात आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरु येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहून झेंडा दाखवत विद्युतीकरण झालेल्या मार्गाचा शुभारंभ करणार आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी, मडगाव आणि उडूपी या तीन ठिकाणी या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये दि. 20 जून दुपारी 2.20 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, विद्युतीकरणामुळे आता या मार्गावरील गाड्या डिझेल ऐवजी विजेवर धावणार असल्याने वर्षाकाठी डिझेवर होणार्‍या खर्चात रेल्वेची सुमारे दीडशे कोटी रुपयांची बचत होणार आहे.

कोरोना काळात देखील कोकण रेल्वेने विद्युतीकरण आणि मार्ग दुपदरीकरणाच्या कामाचा वेग कायम ठेवत काम पूर्ण केले आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी तसेच रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी देखील कोकण रेल्वेच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी खुद्द पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते विद्युतीकरण झालेल्या प्रकल्पाचे राष्ट्राला समर्पण केले जात आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE