- कोकण विकास समितीचे रेल्वे प्रशासनाला निवेदन
रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
मार्गावरील अपेक्षित थांबे:
पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड
पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.
यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.
रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.
