रत्नागिरी, मडगांव तसेच उडुपी येथे इंजिनवरील गाड्यांना दाखवले हिरवे झेंडे



रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या 740 किलोमीटर लांबीच्या विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राष्ट्रार्पण केले. बंगळुरू येथून त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी, उडूपी तसेच मडगाव या ठिकाणी विजेवर चालणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
कोकण रेल्वे विद्युतीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथे प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवली. तेथून रिमोटद्वारे त्यांनी कोकण रेल्वे मार्गावरील विजेवर चालणाऱ्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या प्रदूषणमुक्त विजेवर चालण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
मार्चमध्ये कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण होऊन रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी मार्गाची तपासणी केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 10 प्रवासी गाड्या विजेवर चालण्यासाठी चा कार्यक्रम कोकण रेल्वेने जाहीर केला होता. मात्र, काही कारणाने तो कार्यक्रम नंतर रद्द करण्यात आला होता. त्या नंतर सोमवारी दिनांक 20 जून रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वेचा विद्युतीकृत मार्ग राष्ट्राला समर्पित केला आहे
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे सध्या डिझेलवर होणाऱ्या खर्चात आता वर्षाकाठी दीडशे कोटी रुपये वाचणार आहेत.
2015 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते विद्युतीकरण तसेच दुहेरी करण्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला होता. यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने आता त्याचे राष्ट्रार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे.
सोमवारी झालेल्या रेल्वे विद्युतीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकण रेल्वेचा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असल्याचे सांगून त्याच्या लोकार्पणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लागल्याचे गौरवोद्गार काढले.
