रत्नागिरी : ईपीएफ पेन्शनर संघांच्या अखिल भारतीय समन्वय समितीतर्फे येत्या मंगळवारी (दि. १८ मार्च) कोल्हापूरच्या प्रॉव्हिडंट फंड कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागीय कार्यालयांवर हा धडक मोर्चा निघणार आहे.
प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी पेन्शनरांची व देशाची फसवणूक करीत आहेत. राज्य घटनेने दिलेली जबाबदारी टाळत आहेत. त्यामुळे तीव्र आंदोलानाखेरीज मार्ग नाही, या निष्कर्षाला समन्वय समिती आली आहे. प्रत्येकाला किमान ९००० रुपये पेन्शन, अधिक महागाई भत्ता, प्रवासात सवलत, संपूर्ण मोफत वैद्यकीय सेवा इत्यादी मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे.
सरकारी पेन्शनरांना सरकारकडून पुरेसे लाभ दिले जातात. मात्र खासगी कार्यालयातील पेन्शनरांकडे दुर्लक्ष करीत आहे. या पेन्शनरांना त्यांनी नोकरीच्या काळात प्रॉव्हिडंट फंड केलेल्या एक प्रकारच्या बचतीवर आधारित अत्यंत तुटपुंजी पेन्शन दिली जाते. पेन्शन वाढणारच आहे, असा प्रचार काही मंडळी यूट्यूबवरून करत आहेत. त्यांचा हेतू सरकारला मदत करण्याचा आहे, हे स्पष्ट आहे. अशा प्रचाराकडे दुर्लक्ष करावे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मोर्चातर्फे लोकसभा व राज्यसभेत खासदारांनी याप्रश्नी आवाज उठवावा असे आवाहन करणारी निवेदनेदेखील स्थानिक पेन्शनर संघटना देत आहेत. प्रधान मंत्री, केंद्रीय अर्थ मंत्री, केंद्रीय श्रम मंत्री, श्रम सचिव, पेन्शन विभागाचे अतिरिक्त आयुक्त व सेन्ट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी सदस्य यांनाही अखिल भारतीय समन्वय समितीने निवेदने दिली आहेत.
देशभरातील विभागीय कार्यालयांवरील मोर्चे १८ रोजी काढले जाणार आहेत. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर आणि परिसरातील एमएसईबी, एसटी तसेच खासगी संस्थांच्या पेन्शनरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, गोपाल पाटील व प्रमोद परमणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. कोल्हापूर बसस्थानकाशेजारील विक्रम हायस्कूल मैदान येथे सकाळी ११ वाजता मोठ्या संख्येने जमून विभागीय कार्यालयावरील आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.














