रत्नागिरी (सोनाली सावंत) : कोकणातील निसर्ग जितका सुंदर आहे तसचं इथल आकाशही प्रदूषणरहित आहे. त्यामुळेच भविष्यात खगोल पर्यटन इथल्या पर्यटनाला चालना देणारा एक नवा आयाम ठरू शकतो असं प्रतिपादन प्रा. बाबासाहेब सुतार यांनी केले.
रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय इथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या सुतार यांना जीजेसी ९५ गोल्डन फॅमिली ग्रुपच्या मासिक कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी दुर्बिणीतून अवकाश दर्शनाचा आनंद घेतला.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यांच्यासाठी समुद्र सफर, कृषी पर्यटन, पावसाळी पर्यटन, गड किल्ले भ्रमंती, जंगल सफर,पक्षी निरीक्षण असे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात भरपूर शहरीकरण झाले असले तरीही इथल्या ग्रामीण भागातील सौदर्य पर्यटकांना भुरळ घालते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्यापही ग्रामीण संस्कृती, प्रदूषणविरहीत स्वच्छ आकाश अधिक प्रमाणात टिकून आहे. तुलनेने या जिल्ह्यातील खगोल पर्यटनासाठी ही उपलब्धता अधिक महत्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या दोन्ही जिल्ह्यात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये किंवा एखाद्या मुख्य ठिकाणी एक दुर्बीण आणि अवकाशातील सौंदर्याची, ग्रह, तारे, नक्षत्र, विविध खगोलीय घडामोडी यांची अचूक माहिती देणारे मार्गदर्शक उपलब्ध झाले तर पर्यटकांसाठी नावीन्यपूर्ण असणारे खगोल पर्यटनाचे दालन विकसित करता येऊ शकते असे प्रा. सुतार यांनी सांगितले.
खगोल मंडळाच्या माध्यमातून माहिती देणारे विविध कार्यक्रम सातत्याने होत असताना भविष्यात इथल्या तरुणांना खगोल पर्यटनातून रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध होऊ शकते असही ते म्हणाले. यासाठी महाविद्यालयाच्या खगोल मंडळाच्या माध्यमातून कौशल्य विकास अंतर्गत खगोल पर्यटन हा उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जीजेसी ९५ गोल्डन फॅमिलीतर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.
