- पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्घाटन
रत्नागिरी : सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित दशावतार प्रयोगात्मक कलाशिबिराला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदयजी सामंत यांनी उपस्थिती दर्शवली.
सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली दशावतार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली त्यानंतर मान्यवरांनी नटराजाला पुष्पमाला अर्पण करून श्रीफळ वाहिला.
या सोहळ्यात दशावतारचे भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्र शासनाच्या लोककला पुरस्काराने सन्मानित मा. यशवंत तेंडोलकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना ना. उदय सामंत यांनी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या आठवणींना उजाळा देत, या महाविद्यालयातून अनेक प्रतिभावान कलाकार घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमास गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य मकरंद साखळकर, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राहुल पंडीत, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, तसेच मोठ्या संख्येने कलाकार उपस्थित होते.
हा कार्यक्रम लोककला संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, दशावतार संस्कृतीला नवा आयाम देणारा आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक नंदकिशोर जुवेकर तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आनंद आंबेकर यांनी केले. 17 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे दशावतार प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आले असून सुमारे 36 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.
पहिल्या दिवशीच्या सत्रात श्री. यशवंत तेंडोलकर यांनी दशावतार लोककलेचा इतिहास, पारंपारिक आणि बदलते स्वरूप याविषयी मार्गदर्शन करीत दशावतारातील अनेक घटनांचा संदर्भ देत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
