उरण (विठ्ठल ममताबादे ) : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य पक्षांचे पुढारी स्वार्थासाठी भाजपमध्ये जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. लवकरच मुहूर्त निघेल आणि भाजपशी लगीनगाठ बांधून आपापल्या संसारात रममाण होतील. त्यामुळे रायगडमध्ये सद्यस्थितीत काँग्रेसला पोषक वातावरण असून कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. त्यामुळे रायगडमध्ये लवकरच काँग्रेसचला चांगले दिवस येतील, भाजप-काँग्रेस हेच मोठे पक्ष शिल्लक राहतील, अशीच परिस्थिती आहे, असे ठाम मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या चिरनेर येथे शुक्रवारी रात्री झालेल्या आढावा बैठकीत व्यक्त केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महेंद्रशेठ म्हणाले, काँग्रेस हा देशपातळीवरचा पक्ष आहे, तो मजबूत आहे, चढ-उतार हे येणारच, पण काँग्रेसचा झेंडा महत्त्वाचा आहे. मी कार्यकर्त्यांना अधिकार दिलेत,
त्यांच्या सुख-दु:खात मी सहभागी आहे, मी भरभरून देतोय, आपण समाजासाठीच करतोय, पक्षाचा आदेशही महत्त्वाचा आहे. लोकांनाही काँग्रेसची गरज आहे. माझा जगावर डंका आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनो, तुमच्यामागे मी कायम आहे, हे कधीही विसरू नका.
काँग्रेसचे उरण मतदारसंघाचे आगामी उमेदवार डाॅ. मनीष पाटील म्हणाले, विधानसभेला काँग्रेसचाच दमदार उमेदवार असेल. महेंद्रशेठ आपणा सर्वांना प्रोत्साहन देऊन त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत.
रायगड जिल्हा काँग्रेस महिला आघाडीच्या भावी अध्यक्षा रेखा घरत म्हणाल्या, “आम्हा महिलांचा सन्मान महेंद्रशेठ घरत हेच करतात. महागाई प्रचंड वाढलीय, त्याबाबत आंदोलनाची गरज आहे. मतभेद विसरून काम करणे गरजेचे आहे.”
काँग्रेस आजही मजबूतच आहे. उरण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका ताकदीने लढू या, असे उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी उत्कर्ष उत्तम ठाकूर, स्वप्नज म्हात्रे, उपसरपंच नितेश पाटील, सुचिता ठाकूर आदींचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उरण तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते. महिला कार्यकर्त्यांची संख्य लक्षणीय होती. युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल ढवळे, जे. डी. जोशी, रेखा घरत, बबन कांबळे, नरेश म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
