माजी आमदार संजय घाटगे, पांडुरंग बरोरा यांचा भाजपामध्ये प्रवेश

  • भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ संकल्पनेस साथ देण्यासाठी उबाठा, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादीतून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. नव्याने भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमुळे भाजपा सदस्य संख्या आणखी 50 लाखांनी वाढेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी व्यक्त केला.

उबाठा गटाचे कागलचे माजी आमदार संजय घाटगे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि मालेगाव येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद बळीराम हिरे, श्रीरामपूर चे माजी नगराध्यक्ष संजय फंड यांचा भाजपा प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते. श्री. बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. सीमा हिरे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आदी उपस्थित होते. 

यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले की, कागल व शहापूर च्या माजी आमदारांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला कोल्हापूर आणि ठाणे जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे. मोठा राजकीय वारसा लाभलेले प्रसाद बळीराम हिरे आणि हजारोंच्या संख्येने भाजपामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमुळे नाशिक जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे. आरोग्य तसेच शिक्षण मंत्र्याची धुरा समर्थपणे सांभाळलेले तसेच दीर्घकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणा-या स्व. बळीराम हिरे ह्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर असून त्यांचे पुत्र आणि इतर कुटुंबियांच्या भाजपा प्रवेशामुळे आनंद झाल्याचे श्री. बावनकुळे म्हणाले. शहराच्या विकासासाठी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे श्री. हिरे म्हणाले. भाजपाचे निष्ठेने काम करून भाजपाचा झेंडा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात दिमाखात फडकवू असेही त्यांनी नमूद केले.  

ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीभाऊ देशमुख, श्रीरामपूरचे काँग्रेस नेते व माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास विहाणी  यांच्यासह 12 माजी नगरसेवक, आगरी क्रांती संघटनेचे अध्यक्ष शिवाजी अधिकारी, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक इंद्रजित पडवळ, जिल्हा परिषद माजी सभापती निखिल बरोरा, फलटण चे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, तुषार गांधी, प्रसाद हिरे यांच्या पत्नी सौ. गीतांजली हिरे, नाशिक जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष बाजीराव निकम, रामराव शेवाळे, राजेंद्र लोंढे, अशफाक शेख, सुधाकर बाचकर यांचा भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांत  समावेश आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE