- मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांची माहिती
मुंबई : मराठी भाषा सल्लागार समितीच्या मुंबई पार पडलेल्या बैठकीत समितीमार्फत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अनुवाद अकादमी सुरू करण्याचा निर्णय तसेच भविष्यात बोलीभाषा संशोधन व अध्ययन केंद्र सुरू करण्याचा विचार असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
मंगळवारी मैत्री कक्ष, बॅलार्ड इस्टेट येथे भाषा सल्लागार समिती बैठक पार पडली. मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासंदर्भात मराठी भाषा मंत्री उदय संबंध यांनी माहिती व आढावा घेतला.
मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही,असे आश्वासन भाषा सल्लागार समितीला दिले. तसेच मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व संवर्धन करण्याबाबतच्या योग्य त्या सूचना भाषा सल्लागार समितीला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना ना. सामंत यांनी दिल्या. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व सन्माननीय सदस्य यांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला बैठक भत्ता प्रवास, भत्ता यांमध्ये वाढ करण्याचा प्रश्न सदर बैठकीमध्ये निकालात काढण्यात आला.
या प्रसंगी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांसह समितीचे सन्मा. सदस्य तसेच माननीय सचिव, मराठी भाषा विभाग व अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
