नाणीज : येथील “जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज एज्युकेशनल इन्स्टीट्यूट” या प्रशालेचा दहावीचा निकाल सलग सातव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे. पार्थ संजय कांबळे याने प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे ही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे. येथे सर्व शिक्षण मोफत दिले जाते. प्रशालेचा दहावीचा सविस्तर निकाल असा- पार्थ संजय कांबळे ९८.८० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेत प्रथम आला आहे. त्याचबरोबर कु. आर्या गोरखनाथ कापूरकर हिने ९६.२० टक्के गुण प्राप्त करून प्रशालेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. कु.सान्वी नितीन सावंत हिने ९४.२० टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थान व प्रशालेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज व प.पू. कानिफनाथ महाराज यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले आहेत. तसेच इन्स्टिट्यूटचे चेअरमन श्री.अर्जुन फुले, प्रशालेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील यांनीही सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये पास झालेले आहेत.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान संचलित या इंग्रजी माध्यमाच्या प्रशालेमध्ये पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जाते. नाणीज दशक्रोशीतील अनेक गरजू विद्यार्थ्यांना यामुळे इंग्रजी माध्यमातून दर्जेदार व पूर्णपणे मोफत शिक्षण घेणे शक्य झाले आहे. येथे उत्तम शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्यांना विविध संस्कारक्षम तसेच नीतीमूल्यांची जोपासना करणारे उपक्रम राबवले जातात. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, विविध खेळ, क्रीडा स्पर्धा अशा अनेक उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न या प्रशाले मध्ये केला जातो.
प्रशालेला उत्तम भौतिक सुविधा असलेली इमारत येथे आहे. विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण, वाचनालय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, अशा अनेक सुविधा येथे पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
यावर्षीपासून प्रशालेमध्ये सीबीएससी बोर्डाचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्यात आला आहे.
