रत्नागिरी : जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते लवकरच आपला पदभार स्वीकारणार आहेत.
रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना बढती मिळाल्याने त्यांची मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असणारे नितीन बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नितीन बगाटे यांच्या नियुक्तीमुळे समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध गतिविधींवर नियंत्रण ठेवण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरीतील जिल्हात वाढत असणारा अवैध अमली पदार्थांचा व्यापार समुळ नष्ट करण्याचे मोठे आव्हान बगाटे यांच्यासमोर असणार आहे. श्री. बगाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी व कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
