नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्मोत्सवानिमित्त सुंदरगडावर लोकसंस्कृतीचा जागर
नाणीज : महाराष्ट्राचा ठेवा असलेल्या लोकसंस्कृतीचा सुंदरगडावर जागर व देशभरातील प्रमुख आखाड्याच्या संत महंताकडून, भाविकांकडून एकत्रितपणे केलेले जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे औक्षण, रात्री झालेले प्रवचन, त्यानंतर निरंजनाच्या प्रकाशात व आतषबाजीत अशा आज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत आहे. दिवसभर सुरू असलेला वाद्यांचा गजर, जयघोष या सार्यांच्या सोबतीला जलधारांच्या वर्षावाने उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला.
नाणीज परिसरात सतत पाऊस कोसळतो आहे. त्याची पर्वा न करता रात्रभर, अगदी सकाळपर्यंत भाविक जथ्याने या उत्सवाचे साक्षिदार होण्यासाठी येत होते. जगद्गुरू श्रींचे आज सकाळी सुंदरगडावर आगमन झाले. सर्व देवदेवतांचे दर्शन घेऊन ते संतपीठावर आले. त्यावेळी भाविकांनी एकच जल्लोश केला. गर्दीतले सारे हात उंचावले गेले. जगद्गुरू श्रींनीही हात उंचावून सर्वांना आशीर्वाद दिले. त्याचवेळी देशाच्या विविध राज्यातील आखाड्यांचे व मठांचे प्रमुख संतमहंत या सोहळ्यात सहभागी झाले होते. सारे संतपीठावर स्थानापन्न होते. त्यांची प्रवचने झाली. काहींनी जगद्गुरू श्रींच्यांवर पोवाडे सादर केले. पूजा, आरती नंतर सर्वांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जन्मसोहळ्यानिमित्त औक्षण केले.
त्यानंतर संतपीठावर लोकसंस्कृतीचा सोहळा रंगला. लोकसंस्कृती हा महाराष्ट्राचा ठेवा आहे. तो जपला पाहिजे, या भूमिकेतून जगद्गुरू श्री वेळोवेळी या कलावंतांना प्रोत्साहित करीत असतात. आज त्याचाच भाग म्हणून येथे सार्या लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. त्यात कोळीनृत्य, आदिवासी व धनगरी नृत्य, गोवन फोक, गर्बा, बाल्या नृत्य, गोंधळ, पोवाडा अशा सर्व लोककलांचा सहभाग होता. त्याला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.
रात्री प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू नरेद्राचार्यजी महाराज यांचे प्रवचन झाले. रात्री औक्षण , आतषबाजी, जल्लोश करीत जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी संतपीठावर जगद्गुरू श्रींचा सारा परिवार सौ सुप्रियाताई, प.पू. कानिफनाथ महाराज, सौ. ओमेश्वरी ताई, त्यांची मुले उपस्थित होती. देवाला साकडे घालून सोहळ्याची सांगता झाली.
दरम्यान सकाळी 10 पासून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज चरण दर्शन सोहळा झाला. भाविकांची प्रचंड रांग त्यासाठी होती. त्यानंतर उत्तर रायगड जिल्ह्याचे भजन झाले. दुपारी महा मृत्यूंजय सप्तचिरंजीव यागाची सांगता झाली. सर्व धार्मिक विधी नाशिकचे वे.शा.सं. भालचंद्र शास्त्री शौचे गुरूजी व त्यांच्या सहकार्यांनी केले.
दरम्यान तरडगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) व नाशिकहून निघालेल्या पायी दिंड्या आज श्रीक्षेत्री दाखल झाल्या आहेत. त्यांचे स्वागत संस्थानच्या तरडगावची पायी दिंडी 5 ऑक्टोबरला निघाली होती. दिंडीचे हे 26 वर्ष आहे. 450 किलो मीटरचा प्रवास आहे. त्यात 300 भाविक सहभागी होते. या दिंडीचे प्रमुख गणी अहमद सय्यद हे मुस्लिम समाजातील स्वामीजींचे निस्सिम शिष्य आहेत.
तसेच दुसरी दिंडी नाशिकहून 30 सप्टेबरला निघाली होती. तिचा प्रवास 600 किलो मीटरचा आहे. त्यात 300 भाविक सहभागी झाले आहेत. त्यांचे हे 18 वे वर्ष आहे. सोहळ्यादिवशी त्यांचे सुंदरगडावर आगमन झाले.
सुंदरगड येथे काल रात्रीपासून 24 तास महाप्रसाद सुरू झाला आहे. भाविक त्याचा रांगेने आस्वाद घेत आहेत. सर्व मंदिरांमध्ये दर्शनासाठी रांगा आहेत. दरवर्षीप्रमाणे दोन दिवस येथील सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज रुग्णालयात आरोग्य शिबिर झाले. यावेळी वेगवेगळ्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टर्सनी तपासणी व उपचार केले.















