ग्राहकांनी नियमित वीज बिल भरावे अन्यथा कारवाई : डांगे
रत्नागिरीत महावितरण आढावा बैठक संपन्न
रत्नागिरी : ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्यासाठी महावितरण सदैव प्रयत्नशील आहे. वीज ग्राहकांना सुरळीत सेवा देण्यासाठी विविध तांत्रिक कामे करण्यात महावितरण यंत्रणा सातत्याने व्यस्त असते. ग्राहकांना वीज पुरविण्यासाठी स्वतः एक ग्राहक म्हणून महावितरणला महानिर्मितीसह इतर सरकारी व खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदी करावी लागते. तेंव्हा ग्राहकांकडून वीज बिलांच्या स्वरूपात जमा होणाऱ्या पैशांतून वीज खरेदी व दैनंदिन प्रशासकीय खर्च भागवावे लागतात. ग्राहकांनी नियमित वीज बिल भरणा नाही केल्यास हा खर्च भागविणे कठीण होते. तेव्हा ग्राहकांनी नियमित वीज बिल नाही भरल्यास वीज पुरवठा खंडितची कारवाई करा, असे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्री.चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत.
श्री.डांगे यांनी आज दि.२३ रोजी रत्नागिरी येथे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीस मुख्य अभियंता मा.श्री. विजय भटकर, अधीक्षक अभियंता श्री. नितीन पळसुलेदेसाई, कार्यकारी अभियंता श्री.रामलिंग बेले, श्री. कैलास लवेकर, श्री.विशाल शिवतारे यांच्यासह सर्व उपविभागीय अभियंता उपस्थित होते.
रत्नागिरी विभागातील देवरुख, लांजा, जाकादेवी, रत्नागिरी शहर व ग्रामीण, राजापूर १ व २ व संगमेश्वर , चिपळूण विभागातील चिपळूण ग्रामीण, चिपळूण शहर, गुहागर व सावर्डे, खेड विभागातील दापोली १ व २, खेड, लोटे व मंडणगड या सर्व उपविभागाचा आढावा मा.श्री.डांगे यांनी घेतला. सध्या रत्नागिरी विभागात १४ हजार ७७८ (थकबाकी ५ कोटी ६५ लक्ष) तर चिपळूण विभागात ८०४३ ग्राहक (थकबाकी ३ कोटी ३६ लक्ष) व खेड विभागात ९३३९ ग्राहक (थकबाकी ३ कोटी १४ लक्ष ) विजपुरवठा खंडितसाठी पात्र आहेत. तरी दोन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी वीज बिल थकलेल्या सर्व ग्राहकांचा विजपुरवठा खंडित करा,असे त्यांनी आदेश दिलेले आहेत. ग्रामपंचायत पाणीपुरवठा व पथदिवे ग्राहकांचा विजपुरवठा एप्रिल २०२१ नंतरच्या थकीत व चालू वीजबिल वसुलीसाठी खंडित करा, असेही श्री. डांगे यांनी निर्देशित केले आहे. यावेळी मा.श्री. डांगे यांनी संभाव्य आपत्तीकरिता सज्ज राहावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात १ लक्ष ग्राहकांकडे २६ कोटी ९३ लक्ष रुपये वीज बिल थकबाकी आहे. त्यात घरगुती ७९ हजार ४७७ —८ कोटी ८९ लक्ष, वाणिज्यिक ९७०९—३ कोटी ७२ लक्ष, औद्योगिक ९३० — १ कोटी ४७ लक्ष, पथदिवे १५०५—-९ कोटी ४६ लक्ष,सार्वजनिक पाणीपुरवठा १११४—१ कोटी ६४ लक्ष वीज बिल थकबाकी आहे.