Ultimate magazine theme for WordPress.

चित्रकार प्रभाकर कोलते यांची सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट सावर्डेला भेट 

0 54

संगमेश्वर : सावर्डे येथील सह्याद्रि शिक्षण संस्थेचे सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट हे चित्र -शिल्प कलामहाविद्यालय हे कोकणातील कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.  राजकीय, सामाजिक, सिनेसृष्टी व दृककला अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी कलामहाविद्यालयास सदिच्छा भेट देत असतात. या कला महाविद्यालयाला आज महाराष्ट्रातील नामवंत जेष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांनी भेट दिली.

ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या भेटीचे कारण असे की, सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टच्या कलाविद्यार्थ्यांनी वार्षिक कलाप्रदर्शनात प्रभाकर कोलते यांची ३८५०० पुठ्ठयाच्या चौकोनानपासून १५ फूट x २५ फूट एवढी भव्य कलाकृती तयार केली होती.  ही  भव्य कलाकृती सर्व कलाप्रदर्शनाचे आकर्षण ठरली होती.  त्यावेळी चित्रकार प्रभाकर कोलते यांनी व्हाट्सअँप च्या माध्यमातून आपला अभिप्राय देखील दिला व विद्यार्थ्यांचे कौतुक देखील केले. पण ही कलाकृती प्रत्यक्ष बघायची आहे आणि कलामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्षरित्या कौतुक करायचे आहे, अशी इच्छा त्यांनी कोकणचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार व सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट चे चेअरमन प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांच्याकडे बोलून दाखवली. राजेशिर्के सरांनी होकार दर्शविल्यावर त्यांनी आज कला महाविद्यालयास भेट दिली.सह्याद्रि स्कूल ऑफ आर्ट तर्फे त्यांचे स्वागत व आदरातिथ्य झाले.त्यांच्याबरोबर परेश मखवाना हे देखील उपस्थित होते.कलामहाविद्यालय, कलादालन व विद्यार्थ्यांची कामे बघून ते मंत्रमुग्ध झाले.           यावेळी बोलताना चित्रकार प्रभाकर कोलते म्हणाले की, इथे आल्यावर स्वतःच्या आर्ट सकूल मधे आल्यासारखे वाटले. चित्रकला हि शिकण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे. चित्रकलेत वाचन खुप आवश्यक आहे. चित्रातील विषयाशी मैत्री केली पाहिजे.आपल्या मनातील विचार , भाव त्या चित्रात उतरले पाहिजेत असे अनेक प्रकारचे धडे त्यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना दिले.तसेच त्यांनी स्वतःची कलाकृती पाहिली व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांशी कलात्मक संवाद साधला विद्यार्थ्यांनी देखील आपल्या मनातील कलासंबंधीच्या अडचणीत उपस्थित केल्या त्याचेही त्यांनी निराकरण केले . प्राचार्य माणिक यादव यांनी कोलते सरांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.