रत्नागिरीत उद्यापासून रत्न कृषी महोत्सव
शेतकर्यांना पर्वणी; परजिल्ह्यातील पशुधन स्थानिक शेतकर्यांना पाहता येणार
रत्नागिरी : राज्य शासनाच्या धोरणा अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित होणार्या हापूस आंब्याच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीत 19 ते 21 मे या कालावधीत रत्न कृषीमहोत्सव होणार आहे. यामध्ये शेतकर्यांना मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच लातूर, सोलापूर, कोल्हापूर येथून आणलेले पशूधनही शेतकर्यांना पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली.
या महोत्सवासाठी 45 लाखाचा खर्च अपेक्षित असून जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद कृषी विभागासह आमदार फंडातून निधीची तरतूद केली जाणार आहे. रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे 19 ते 21 मे या कालावधीत आयोजित केलेल्या रत्न कृषी महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाची माहिती जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक सुनंदा कर्हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील म्हणाले की, आंबा उत्पादक आणि बचत गटांच्या विविध उत्पादनांना थेट ग्राहक उपलब्ध करुन देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केले असून, शेतकर्यांना सेंद्रीय शेतीविषयक मार्गदर्शन परिसंवादही आयोजित केला आहे. तसेच हापूसच्या हंगामात अनेक पर्यटक रत्नागिरीत येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट उभारण्याबाबत विचार केला जाईल. हापूस विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आंबा विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सूचना केली आहे. लवकरच याचे नियोजनही केले जाणार
आहे.
जिल्हा नियोजनमधून दहा लाख, जिल्हा परिषद पशू विभागाकडून 10 लाख आणि आमदार फंडातून उर्वरित निधीची तरतूद केली जाणार आहे. यामध्ये मंडणगडपासून शेतकरी सहभागी होणार आहेत. पशु प्रदर्शनात येणार्यांना वाहतुकीची सुविधा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. दर्जेदार पशु लोकांना पाहता यावेत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.