रत्नागिरीत चोरीच्या आंबा व्यवसायाची चलती
कारवाईसाठी आंबा बागायतदारांची जिल्हाधिकार्यांकडे धाव
रत्नागिरी : विविध कारणांनी आंबा व्यावसायिक संकटात असतानाच सध्या आंबा चोरीच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आंबा खरेदी विक्री केंद्रांचा सुळसुळाट झाल्याने ‘बॅटरी’ आंबा चोरांचे फावले आहे. त्यामुळे रात्री उशिरापयर्र्त चालणार्या हापूस आंबा खरेदी केंद्रांवर बंदी घालावी, अशी मागणी आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
आंबा हंगामाचा शेवटचा टप्पा सुरु झाला असून बागायतदारांची आंबा काढणीकडे लगबग सुरु आहे. त्यामुळे एखाद्या बागेत गुरखा किंवा राखणदार नसल्याची संधी साधत संध्याकाळी काळोख पडल्यावर रात्री अकरा-बारावाजेपयर्र्त आंबा चोरट्यांनी धुमाकुळ घालण्यास सुरुवात केली आहे. बॅटरी आंबा म्हणून चोरीचा आंबा खरेदी विक्री केंद्रांमध्ये प्रसिध्द आहे. सध्या 30 ते 40 रुपये किलोला दर मिळत आहे. काही बागायतदारांचे रातोरात 10 ते 30 क्रेट आंबा चोरी झालेला आहे. दोन पेक्षा अधिकजणांची टोळकी यात सहभागी होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एका रात्री कष्ट न करता दोन-चार हजार रुपयांची प्रत्येक व्यक्तीची सोय होत असते. आंबा खरेदीविक्री करणारी केंद्र रात्री बारा ते एक वाजेपयर्र्त सुरु रहात असल्याने आंबा चोरट्यांना फायद्याचे झाले आहे.
आंबा चोरीमुळे बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. काही ठिकाणी नेपाळी गुरख्यांना दमदाटी केली जाते किंवा मारहाण करुन चोरी केली गेली आहे. आंबा खरेदीविक्रीय करणारी बहुतांशी केंद्रे अनधिकृत आहेत या केंद्रांनी कृषी खात्यांकडून किंवा अन्य संबंधित विभागाकडून परवानाही घेतलेला नसतो. या केंद्राकडे विक्रेते म्हणून जीआय रजिस्ट्रेशनही नसते. त्यामुळे अशा खरेदीविक्री केंद्रांची चौकशी करुन त्यावर कारवाई करावी. ही आंबा खरेदी केंद्रे सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत प्रकाश ाळवी, मुकुंद जोशी, मंगेश साळवी व अन्य व्यावसायिक यांनी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना निवेदन दिले.