रत्नागिरी : प्रशासनाकडून लवकरच बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण करणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश लाड यांच्या सूचनेनुसार बारसू रिफायनरी सर्वेक्षणाचे काम थांबविण्याबाबत काँग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष हारीस शेकासन, महिला कांग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीमती रुपालीताई सावंत व शहर अध्यक्ष रमेश शाहा यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुर्यवंशी यांना निवेदन दिले.
यावेळी प्रसाद उपळेकर माजी तालुकाध्यक्ष, आतिफ साखरकर, जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कोकणात व विशेषतः राजापूर तालुक्यात भयंकर उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हाळ्यात सर्वेक्षण सुरू केल्याने रिफायनरी विरोधी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली तर मोठा उद्रेक होऊ शकतो. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात खारघर येथे नुकताच सरकारची बेपर्वा वृतत्ती व नियोजनशून्य आयोजनामुळे शेकडो लोक जखमी व सुमारे २० लोक मृत्यु पावल्याचे वृत्त मिडियामध्ये प्रसिद्ध झाले होते. अशा परिस्थिती मध्ये बारसू रिफायनरी च्या सर्वेक्षण वेळी जनतेमधून मोठा विरोध केला जाण्याची अधिक शक्यता आहे. खारघरची पुनरावृत्ती होवून अशीच घटना बारसू येथे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला स्थानिक जनतेचा बारसू रिफायनरीला असलेला विरोध लक्षात घेता, बारसू रिफायनरी सर्वेक्षणचे काम थांबवावे असे निवेदन काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले















