कोकणची माती, कोकणचा निसर्ग, कोकणची संस्कृती आणि कोकणची माणसं आपणास ज्या पुस्तकाच्या पानापानातून भेटतात ते म्हणजे जे.डी.पराडकर यांचे चपराक प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले ‘साद निसर्गाची’. कोकणच्या निसर्गाने सर्वांना भुरळ घातलेली आहे. एका बाजूला विशाल असा अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड असा सह्याद्री, याच्या मध्ये विविधतेने नटलेला कोकण. या कोकणच्या निसर्गाने अख्या जगाला मोहिणी घातलेली आहे. यातून कोकणातील माणूस तरी कसा बाजूला राहील? कोकणचे सौंदर्य आणि औदार्य आपल्या प्रभावी वर्णनाने उलघडून दाखवले आहे ते पत्रकार आणि लेखक जे. डी. पराडकर यांनी.
कोकणच्या निसर्गातील मानवी आणि मानवी घटकांचे तसेच अनेक प्रसंगांचे समर्पक वर्णन ‘साद निसर्गाची’ या लेखसंग्रहातून वाचावयास मिळते. ज्याला कोकण आणि कोकणची संस्कृती अभ्यासावयाची आहे त्यांना हे पुस्तक म्हणजे अप्रतिम मार्गदर्शक आहे. प्रत्येकाने हे वाचलेच पाहिजे. मूळ पत्रकारितेचा पिंड असलेले जे.डी.पराडकर हे कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील लोवले गावचे. तीस वर्षे पत्रकारितेचा अनुभव, 500 ऊन अधिक विविध लेखांचे लेखन त्यांनी केले आहे. निसर्गातील बारकाव्याचे, वैविध्याचे निरीक्षण करून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत लेखन केले आहे. लेखकाने म्हटल्याप्रमाणे निसर्गावर लेखन करण्यास लेखक कमी पडेल एवढे विषय निसर्गाच्या या भव्य प्रांगणात दडलेले आहेत. त्यातल्याच 33 विषयांवर लिहिलेल्या लेखांचे पुस्तक म्हणजे ‘साद निसर्गाची’.
कोकणचा ‘रानमेवा’ आपणास पुस्तकाच्या सुरुवातीलाच भेटतो. रानमेवा ही संपूर्ण कोकणाची ओळख ठरते. यामध्ये डोंगरची काळी मैना म्हणजेच करवंदे, अळू, जांभूळ, आंबे आणि फणस याचा मनसोक्त आस्वाद येथे प्राप्त होतो. हा रानमेवा पुन्हा पुन्हा चाकावा वाटतो, म्हणूनच लेखक म्हणतो ‘रानमेवा मे महिन्यात वाटतो हवा हवा’
‘आगर’ म्हणजे कोकणचे वैभव. नारळी पोफळीच्या विस्तीर्ण बागा हेच आगर. कोकणच्या माणसाच्या हृदयाची विशालता आग्राप्रमाणेच आहे. पावसाच्या पहिल्या सरींचा अलगद शिडकावा ‘सुखाच्या सरी’ मधून आपल्यावर होतो. पावसाची पहिली सर बळीराजा बरोबरच चातकालाही तृप्त करून जाते. लेखकाने ‘कृष्णकमला’ची वेल उखडून टाकल्यानंतर तीन ते चार वेळा प्रयत्न करूनही पुन्हा कृष्णकमलाची वेल फुलत नाही. शेवटी महत्प्रयासाने ती फुलते. मला वाटते कृष्णकमलाची वेल नात्यासारखी आहे. त्याला खतपाणी घालून वाढवावे लागते. पुन्हा पुन्हा जपावी लागते. तुटलेली नाती याच पद्धतीने जोडण्याची संस्कृती कोकणच्या मातीत रुजल्याचे जाणवते.
‘मचाण’ जरी उंचावरून खाली प्राण्यांचे निरीक्षणासाठी बांधलेले असले तरी मचाणावर चढताना आपण भविष्यातील जीवनप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय असे लेखकाने मचाणाचा मानवी मनाची सहसंबंध जोडला आहे. मधुघट मधून मधमाशांचे कौशल्य पूर्ण काम समजून येते. प्राण्यांबरोबरच पक्षांची ही तहान भागवतो तो पाणवठा. दोन बाजूंप्रमाणे दोन्ही बाजूंकडील माणसांची मने जोडणारा ‘सांकव’. कोकणातील निसर्गाला आलेला ‘बहर’ लेखकाने अनोख्या प्रकारे शब्दबद्ध केलेला आहे. मात्र निसर्ग संपदेची होणारे लूट निसर्गाचा ऱ्हास करत असल्याची जाणीव वाचनातून होते. लेखकाच्या संवेदनशील मनाची होणारी घालमेल यातून कळून येते.
शाळेत फक्त म्हणीतून भेटलेला ‘पळस’ येथे मात्र वेगळ्या रूपात भेटतो. ‘फ्लेम ऑफ दी जंगल’ असे मारुती चितमपल्ली यांनी वर्णन केलेला ‘पळस’ पक्षांना आणि मधमाशांना आकर्षित करतो. कोकणच्या आंबा डाळीचे रसभरीत वर्णन वाचून तिची अविट आंबट चव चाखल्याची भावना वाचकाला झाल्याशिवाय राहणार नाही. कोकणामध्ये माणूसपणाची जपलेली अनमोल नाते, माणुसकीची नाळ दृढ करणारी आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी नाती वृध्दींगत करण्याचा प्रयत्न करण्याची साद यातून लेखकाने घातली आहे.
प्राजक्ताचा दरवळ, आंब्याची ‘समृद्धी’ या दोन्ही लेखातून कोकणाचा निसर्ग डोकावतो आहे. समृद्धी मधून आंब्याच्या विविध प्रकारांनी कोकण कसा समृद्ध झाला आहे हे समजते. सोनेरी प्रकाशाची पखरण करणारा काजवा, आयुष्य जरी क्षणभंगुर असले तरी इतरांना प्रकाशाची प्रेरणा देणाऱ्या काजव्याचे समर्पक वर्णन लेखकाने केले आहे. काटेरी माधुर्याचा फणस जसा आपणास कोकणात भेटतो तसा मंदगंधांचा ‘बकुळ’ फुललेला ‘सोनटक्का’ आणि ‘अनंत’ही भेटतो.
जे.डी.पराडकर यांनी विविध पानांची महती ‘मानाचे पान’ मधून वर्णन केली आहे. पावसाळ्यातील वहाळांचे वर्णन वाचून तर प्रत्यक्षात समोरच ‘वहाळ’ खळाळत आहे असे वाटते. ‘हिरवे वाफे’, ‘पुष्प’, ‘हसरी तुळस’, ‘नागचाफ्याचा गंध’ मधून कोकणातील निसर्गाची विविध रूपे लेखकाने अप्रतिम पणे रेखाटली आहेत. फुलांचा राजा ‘गुलाब’ आणि काटा यांचे अनोखे नाते लेखकाने हळुवारपणे उघडले आहे. नाजूक गुलाबाची योग्य काळजी घ्यावी यासाठी त्याला संरक्षण म्हणून असणारा काटा दुर्लक्षून चालत नाही आणि चालणारही नाही.
निसर्गाची कोकणातील मुक्त उधळण लेखकाने आपल्या शब्दांमध्ये सामावून घेतली आहे. कोकणातील निसर्गाची साद या माध्यमातून सर्व दूर पसरत आहे. लेखकाला समाजामध्ये, परिसरामध्ये अवतीभवती असणाऱ्या घटकांची आणि घटनांचे निरीक्षण डोळसपणे करावे लागते, जे जे.डी.पराडकर यांनी केले आहे. त्यांच्या लेखनाची धाटणी वेगळी आहे. वाक्यांमध्ये सुसंगतता आहे. लेखनामध्ये असलेल्या प्रवाहीपणामुळे वाचन प्रवाही बनते. बोजड शब्द जंजाळामध्ये लेखक अडकून पडत नाही. सहज, सोप्या भाषेमुळे जे.डी.पराडकारांची एक वेगळी लेखन शैली निर्माण झाली आहे. या अनोख्या लेखनशैलीचा आस्वाद घेण्यासाठी ‘साद निसर्गाची’ हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावे.

पुस्तकाचे नाव :- ‘साद निसर्गाची’
लेखकाचे नाव :- जे. डी. पराडकर
प्रकाशन :- चपराक प्रकाशन, पुणे
पुस्तक परिचय लेखन
रवींद्र खंदारे सातारा














