योग- जागतिक शांतीदूत

जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले, आपले आरोग्य संपन्न करणारे शास्त्र म्हणजे “योग”. दि.२१ जून या “जागतिक योग दिन” निमित्त भारताबरोबरच अनेक देशांमध्ये ९ वा “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा होत आहे. समग्र सर्वांगीण उत्तम स्वास्थ्य मिळविण्याच्या हेतूने “वसुधैव कुटुंबकम्” या पार्श्वभूमीवर आधारित “One World One Health” हा या वर्षीचा विषय आहे. स्वतः बरोबर पूर्ण जगाचे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्वास्थ्य योग च्या माध्यमातून संतुलित करणे, हा वैश्विक उद्देश यामागे आहे. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दि.२१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्यसाधारण लाभांमुळे आज योग जगात सर्वत्र लोकप्रिय आहे.

भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला. सर्व जग करोनाच्या विळख्यात अडकलेले असताना भारतातील अनेक योग प्रशिक्षकांनी “हे विश्वाची माझे घर” हाच विचार ठेवून सर्व जगामध्ये योग प्रशिक्षण दिले. विशेषत: मानसिक बळ वाढविण्यासाठी याचा उपयोग झाला. श्वसन मार्ग शुद्ध करणारी, फुफ्फुसांना बळकटी देणारी ‘जलनेती’ ही शुद्धीक्रिया करोना काळात सर्वांसाठी लाभदायक ठरली. अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांनी आणि डॉक्टरांनीही याचा सराव केला. यावर शास्त्रीय संशोधन झाले आणि आजही सुरु आहे. शितली, शित्कारी सारखी शरीराचे तापमान संतुलित ठेवणारे, उष्णतेच्या विकारांवर प्रभावी असणारे प्राणायाम, मानसिक स्वास्थ्य प्रदान करणारे महत्वाचे अंग म्हणजे ‘ध्यान’ यावरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन करण्यात आले. योग कडे फक्त व्यायाम म्हणून न बघता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक जीवनशैली म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले पाहिजे. दिवसाची सुरुवात प्रार्थनेने करून सूर्यनमस्कार घालणे, विविध प्रकारची आसने करून स्थिरता अनुभवणे, दृढतेसाठी प्राणायाम आणि ध्यान अशा जीवनशैलीमुळे माणसाचा प्रवास मनाच्याही पलीकडे चित्त प्रदेशाकडे होतो. यम नियमातील मानसिक-शारीरिक स्वच्छता, संतोष, तप, स्वतःच्या आचरणाचा अभ्यास करणे आणि ईश्वराचे चिंतन यामुळे मनुष्य आपोआपच आधात्मिक अनुभूती घेतो. योग हे आपले प्राचीन शास्त्र आहेच, पण त्याचबरोबर आयुर्वेद, युनानी यांचा प्रसार देखील भारत सरकार पूर्ण जगभरात करीत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवस सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी भारत सरकार प्रत्येक खेडेगाव अन् शहरातील अंगणवाडी, ग्रामपंचायत, शाळा, सरकारी कार्यालयांपासून, बहुराष्ट्रीय कंपन्यांपर्यंत जागतिक योग दिवसाचे महत्व पोहोचवून त्या ठिकाणी हा दिवस साजरा करीत आहे.

मागील काही वर्षांमध्ये झालेल्या योग प्रचाराचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की, योग प्रशिक्षणाची मागणी सर्वत्र वाढत आहे, योग कडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टीकोन वाढीस चालला आहे. सर्व जगाला जोडण्याची ताकद योग शास्त्रामध्ये आहे, आपण सर्वांनी भारतीय परंपरेने आपल्याला प्राप्त झालेल्या या शास्त्राचा आदर करून, याचे आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्व ओळखून योग जीवन शैली आपल्या आयुष्यात प्रत्यक्षपणे आणण्याचा प्रयत्न करू या. ऊर्जा आणि सकारत्मकता प्राप्त करून देणारे योग शास्त्र काही वर्षांनी जगाच्या इतिहासामध्ये ‘जागतिक शांतीदूत’ म्हणून नक्कीच संबोधले जाईल.

प्रा.सानिका बाम
sanikabam83@gmail.com

 

थोडक्यात परिचय

प्रा.सानिका बाम,पुणे या
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही वर्षांपासून योगशास्त्र शिकवित आहेत. त्या भारतासह अमेरिका, सिंगापूर , नॉर्वे, कॅनडा या विविध देशांमध्ये योग शिक्षण प्रचार-प्रसाराचे काम करीत आहेत.


योग शास्त्र आणि संगीत या दोन्ही विषयांमध्ये एम.ए पर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले आहे. त्या भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये योग च्या विविध कोर्सेस च्या माध्यमातून शिकविण्यासाठी जातात तसेच सध्या पुणे येथील विश्वकर्मा विद्यापीठामध्ये योग आणि निसर्गोपचार विभागाच्या त्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
आजपर्यंत केंद्र शासनाचे विविध उपक्रम, महाराष्ट्र पोलीस, कॉर्पोरेट सेक्टर, कॅन्सर,एड्सग्रस्त पेशंटची काळजी घेणारी केंद्रे/संस्था, शाळा-कॉलेज अशा विविध ठिकाणी त्या अनेक लोकांना योग शिक्षण देत आहेत. त्यांनी योग प्रचार-प्रसारासाठी विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जागतिक संशोधन परिषदांमध्ये अत्यंत क्रियाशीलतेने सहभाग घेतला आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE