विद्यार्थ्यांचा स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग
देवरुख दि. १८ ( प्रतिनिधी ): ग्रंथालय क्षेत्रास नवीन आयाम देणारे एक लोकविलक्षण व्यक्तिमत्व, ज्याने आधुनिक ग्रंथालयाच्या विकासास गती व दिशा दिली ते म्हणजे पद्मश्री डॉ. एस आर. रंगनाथन. डॉ. रंगनाथन यांची १३१वी जयंती ‘ग्रंथपाल दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे -पित्रे महाविद्यालयात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. स्नेहलता पुजारी, प्रा. विकास शृंगारे, प्रा. डॉ. सागर संकपाळ, प्रा. अजित जाधव, प्रा. धनंजय दळवी, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. प्रशांत जाधव, भूगोल विषयात पी.एच.डी. करणारी दिल्लीतील विद्यार्थिनी आस्था कपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाची माहिती, तसेच वाचन संस्कृती अधिकाधिक वृद्धिंगत होण्याकरीता आयोजित करण्यात येणारे विविध उपक्रम व ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांची माहिती याप्रसंगी दिली. ग्रंथपाल प्रा. मायंगडे यांनी उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना वाचन संकल्प प्रतिज्ञा दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात ग्रंथालय शास्त्राचे जनक व थोर गणिततज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा घेताना ग्रंथालय वर्गीकरणातील डॉ. रंगनाथन यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. तसेच ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ५०,००० हजारहून अधिक वाचन साहित्याचा अधिकाधिक वापर स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी करावा असे आवाहन केले.
ग्रंथ प्रदर्शनामध्ये हिंदी, मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील विविधांगी साहित्य प्रदर्शित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचा बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लाभ घेतला. ग्रंथपाल दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण ३७८ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. धनंजय दळवी, ग्रंथालय सहाय्यक स्वप्नील कांगणे, रोशन गोरुले, महेंद्र मेचकर, राहुल मांगले व विद्यार्थी चैतन्य भागवत यांनी मेहनत घेतली.
