प्रायोगिक थांबा मिळालेल्या नेत्रावती एक्सप्रेसचे संगमेश्वर रोड स्थानकात जोरदार स्वागत

दीपक पवार यांनी केला पाहिला प्रवास!

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या संगमेश्वर रोड स्थानकावर नव्याने थांबा मिळालेल्या नेत्रावती एक्सप्रेसचे मंगळवारी सायंकाळी अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. संगमेश्वरवासीय जनतेच्या वतीने आंदोलन करणाऱ्या संगमेश्वर- चिपळूण फेसबुक समूहाचे श्री. संदेश जिमन यांच्यासह संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजू महाडिक, चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पूजा निकम, अशोक जाधव यांच्यासह नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळावा म्हणून वेळोवेळी करण्यात आलेल्या आंदोलनात उतरलेली आणि आंदोलनाला पाठिंबा दिलेली असंख्य मंडळी उपस्थित होती.

रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वेच्या खेड तसेच संगमेश्वर स्थानकावर नवे प्रायोगिक थांबे मंजूर केले आहेत. त्यानुसार संगमेश्वर स्थानकावर प्रायोगिक तत्वावरील थांबा मिळालेली नेत्रावती एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी पहिल्यांदाच संगमेश्वर स्थानकावर आली तेव्हा थांब्यासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते संदेश जिमन, संगमेश्वरातील व्यापारी संघटनेचे बापू भिंगार्डे, सुशांत कोळवणकर, गणपत दाभोलकर, नरेंद्र खानविलकर, मुकुंद सनगरे, नितिन जाधव, संतोष पाटणे यांच्यासह संगमेश्वरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एक्सप्रेसला पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. गाडीचे संगमेश्वर स्थानकात आगमन होताच गाडीच्या लोको पायलटला देखील गौरवण्यात आले.

नेत्रावती एक्सप्रेसला प्रायोगिक थांबा मिळाल्यानंतर या गाडीतून पहिला प्रवास करण्याचा मान संगमेश्वर मधील कोंड उंमरे येथील दीपक पवार यांनी मिळवला. नेत्रावतीला थांबा मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्यांमध्ये दीपक पवार यांचाही समावेश होता.

यावेळी नेत्रावती एक्सप्रेस थांबण्यासाठी आंदोलन केलेल्या मंडळींच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून येत होता. आंदोलनाला यश आल्यामुळे संगमेश्वर वासीय योजनेचा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE