समाजभान असलेले संवेदनशील चित्रकार समाज जागृतीचे काम करतात : ज्येष्ठ चित्रकार प्रकाश राजेशिर्के

    • चित्रकार गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले यांचा सत्कार

    चिपळूण : चित्रकार-कलाकार अत्यंत संवेदनशील असतो. तो स्वतःच्या संवेदना जागृत ठेवून इतरांच्याही जागृत करण्याचे काम पोटतिडीकीने करत असतो. अत्यंत आवश्यक असतं. ते या कलाकारांमध्ये आहे. या दोन्ही कलाकारांना मी समाजमाध्यमांमधून पाहात आलो आहे. आज त्यांची कला प्रत्यक्षात पाहिली. अवयवदानाच्या क्षेत्रात चित्रकार कळसकर काम करत आहेत. दर रविवारी लहान मुलांसाठी चित्रकलेचे मोफत क्लास घेतले जात आहेत. या चित्रकारांच्या कलांत समाजभान आणि संवेदना दिसतात. जगात कलेच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या संस्थांनी आपल्या कामाची दखल कमी वयात घेणे हे कौतुकास्पद आहे. या चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचे ‘लेपन’ हे त्यांच्या स्वभावाप्रमाणे शांत रंगातील असल्याचे मत सावर्डेतील कला महाविद्यालयाचे संस्थापक, माजी प्राचार्य, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी व्यक्त केले.

    शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, संस्कार भारती आणि हौशी चित्रकार संघटनेच्या वतीने वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात प्रसिद्ध कलाकार गणेश कोंडिराम कळसकर आणि प्रज्ञा अरुण इंगवले यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

    यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, सत्कारमूर्ती चित्रकार गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले, संस्कार भारती उत्तर रत्नागिरीचे अध्यक्ष शरद तांबे आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे होते. भोसले यांनी कलाकारांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. चित्रकलेत भविष्य घडवू पाहणाऱ्या शहरातील नव्या पिढीसाठी आजच्या सत्कारमूर्तींच्या सहाय्याने एकत्रित काम करू अशी भूमिका भोसले यांनी मांडली. ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रकाश राजेशिर्के आणि चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याहस्ते चित्रकार गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले आभार शरद तांबे यांनी मानले.

    छायाचित्र : संजय शिंदे, चित्रम डिजिटल, चिपळूण

    मुलाखतीतून उलगडले कलेचे विश्व

    चित्रकार गणेश कळसकर आणि प्रज्ञा इंगवले यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात लेखक-पत्रकार धीरज वाटेकर यांनी या चित्रकारांची मुलाखत घेतली. ही मुलाखत खूप रंगतदार झाली. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना कळसकर म्हणाले, बीड जिल्ह्यातील मूळ गावातून चित्रकार म्हणून कारकीर्द करणारा मी पहिला आहे. आमच्या कुटुंबाला सुतार कामाचा म्हणजेच कलेचा वारसा लाभलेला आहे. शालेय जीवनात सातवीपर्यंत चित्रकलेला खूप विरोध झाला होता. शाळेतील चित्रकलेचे शिक्षक बीडचे अब्दुल गफार यांनी माझ्यातील उद्याचा चित्रकार खूप लवकर ओळखला होता. ते मला नेहमी म्हणायचे, ‘तुला कारपेंटर नव्हे पेंटर बनायचे आहे.’ शालेय चित्रकला परीक्षांची फीही सरांनी कधी कोणाकडून घेतलेली नाही. शाळेतील योग्य विद्यार्थी निवडून त्यांना चित्रकला परीक्षेला ते बसवायचे. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांना भेटून विद्यार्थ्यातील चित्रकलेच्या गुणाविषयी सांगायचे. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांसाठी गफार सरांनी शाळेत स्वतंत्र स्टुडीओ तयार केल्याची आठवणी सांगितली. बीडमधून पुण्यात ‘अभिनव कला महाविद्यालय’मध्ये शिक्षण घ्यायला येईपर्यंत पूर्णपणे चित्रकलेला वाहिलेलेही कॉलेज असते याची आपल्याला कल्पनाही नव्हती असे कळसकर यांनी नम्रपणे नमूद केले. कॉलेजात शिकतानाच्या काळात कळसकर यांचा स्वभाव बंडखोर चित्रकाराचा होता. त्याची झलक त्यांच्या चित्रातही दिसायची. कॉलेजातील शिक्षक नेहमी सांगायचे, ‘कॉलेज फक्त तंत्र शिकवते. चित्रकार बनवत नाही. शिकवलेल्या तंत्राचा उपयोग करून तुम्ही चित्रकार बनायचे असते.’ आपल्या चित्रकलेच्या प्रवासात ‘संस्कार भारती’ची खूप मदत झालेली आहे. माझ्यातील चित्रकाराला एक व्यक्ती म्हणून समाजासमोर उभा करण्याचे काम ‘संस्कार भारती’ने केले आहे. असेही कळसकर म्हणाले.

    प्रज्ञा इंगवले यांनी बोलताना, उत्तम समाजभान जपणाऱ्या घरातील संस्कारांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे नमूद केले. चित्रकलेची आवड असूनही कलेच्या प्राचीन वारश्याची जोपासना, जीर्णोद्धार हाही विषय विशेष काम करण्याचा असल्याचे एका व्याख्यानातून समजल्यावर त्या क्षेत्राची आवड निर्माण झाल्याचे सांगितले. पुण्याच्या अभिनवमध्ये शिकताना याच दृष्टीने शिक्षण घेतले. त्यामुळे प्रयत्न करून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालय संस्थानमध्ये मास्टर डिग्री कोर्ससाठी प्रवेश घेता आला. देशात खूप जुनी संग्रहालये आहेत, नव्याने होत आहेत. यातील वस्तूंच्या जतनीकरणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसे शिक्षण घेतलेल्या व्यक्तींची नियुक्ती संग्रहालयात होणे आवश्यक आहे. दुर्मीळ चित्राचा जीर्णोद्धार करण्याची प्रक्रिया प्रज्ञा इंगवले यांनी मुलाखतीतून उलगडून सांगितली. चित्रकारांच्या शैलीदार जगण्यामुळे चित्रकार आणि समाज यांच्यात अंतर निर्माण झाल्याची खंत व्यक्त करून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न नवीन पिढीचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला करायचे असल्याचे कळसकर यांनी सांगितले. कोणतेही चित्र घडवताना ती आपली शेवटची कलाकृती आहे, अशा विचाराने आपण चित्र काढत असल्याचे कळसकर यांनी सांगितले. उदयोन्मुख चित्रकारांची चित्रे खरेदी करावीत. किमान आपण प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला एखादे चित्र घ्यावे अशी विनंती कळसकर आणि इंगवले यांनी केली.

    मुलाखतीत वाटेकर यांनी विचारलेल्या, चित्रकलेकडे कसे वळलात? इथपासूनच्या चित्रकलेच्या सुरुवातीच्या काळातील अनुभव, कोणत्या प्रकारातील चित्रे रेखाटता? त्यांची प्रक्रिया नेमकी कशी असते? स्वतःचे विचार आणि कला यांचं काही नातं आहे का? विचारांचा प्रभाव कलेवर पडलेला आहे का? चित्रकार आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडतात? चित्रकाराने कलेचे जागरण केले पाहिजे, चित्रकलेचे भविष्यातील विचार या प्रश्नांना कळसकर आणि इंगवले यांनी दिलेल्या उत्तरांनी ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.

    Digi Kokan
    Author: Digi Kokan

    Leave a Comment

    READ MORE

    best news portal development company in india

    READ MORE