मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ८ ऐवजी १६ डब्यांची चालवावी
कोकण विकास समितीकडून रेल्वे मंत्रालयासह मध्य रेल्वेकडे पाठपुरावा
सुरुवातीपासूनच वंदे भारत एक्सप्रेसला सरासरी ९५ टक्के प्रतिसाद
अंमलबजावणी केल्यास रेल्वेच्या तिजोरीतही पडणार भर
मुंबई : मुंबई गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभापासूनच लोकप्रिय बनली आहे. गेल्या जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यापासून आजपर्यंत तिला सरासरी जवळपास ९५ टक्के भारमान मिळत आहे. या गाडीची लोकप्रियता लक्षात घेऊन ही गाडी सध्याच्या ८ ऐवजी १६ डब्यांची करावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीने रेल्वे मंत्रालयासह मध्य रेल्वेला पाठवले आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान धावणारी (22229/22230) वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीपासूनच जवळपास हाऊसफुल्ल धावत आहे. ही गाडी रेल्वेच्या तिजोरीत चांगलाच महसूल टाकताना दिसत आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाडीची लोकप्रियता लक्षात घेऊन मुंबई सीएसएमटी – मडगाव दरम्यान धावणाऱ्या या गाडीला १६ डब्यांचा रेक उपलब्ध करून चालवावी,अशा मागणीचे निवेदन कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी सुविधांसाठी नेहमी आग्रही असलेल्या कोकण विकास समितीने रेल्वे मंत्रालयासह रेल्वेच्या सर्व संबंधित विभागांना पाठवले आहे.
सध्या ही गाडी आठ डब्यांची चालवली जात असल्यामुळे या गाडीला सध्या मर्यादित सीट उपलब्धता असलेल्या पाहायला मिळत आहेत. या बाबींचा विचार करता या गाडीची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी ही गाडी आठ ऐवजी १६ डब्यांची चालवावी, अशी आग्रही मागणी कोकण विकास समितीने केली आहे. समितीच्या श्री. जयवंत दरेकर यांनी हे निवेदन नुकतेच सर्व संबंधितांना पाठवले आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसला प्रतिसाद मिळणार नाही, ही कुशंका प्रवाशांनीच खोडून काढली आहे. बरेच प्रवासी प्रतीक्षा यादी पाहून तिकीट काढणे टाळतात. तसेच, कोकण रेल्वेच्या विविध पत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे मार्गाचा वापर क्षमतेच्या १६८% पर्यंत वाढलेला आहे. त्यामुळे या मार्गावर चालणारी प्रत्येक गाडी पूर्ण क्षमतेने चालायला हवी. म्हणूनच लवकरात लवकर ही गाडी १६ डब्यांची करायला हवी. त्यामुळे गाडीची एकूण क्षमता वाढेलच परंतु मुंबईकडे येताना रत्नागिरी आणि खेडसाठीचा आरक्षण कोटाही वाढेल. त्याचा फायदा संबंधित स्थानकांच्या व रेल्वेच्या एकूण उत्पन्नवाढीसाठी होईल. विशेषतः खेडला या वाढीव उत्पन्नाचा फायदा होऊन आणखी सुपरफास्ट गाड्यांचे थांबे मिळण्यास मदत होईल. तसेच प्रतीक्षा यादीही कमी होईल व प्रवाशांना जलद प्रवासाचा पर्याय कायमच उपलब्ध राहील.
– अक्षय महापदी सदस्य, कोकण विकास समिती
गोवा वंदे भारत एक्सप्रेस या स्थानकांवर थांबते
शुक्रवार वगळून आठवड्यातून सहा दिवस चालवण्यात येणारी गोवा वंदे भारत एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली तसेच थिवी हे थांबे घेते. सुरुवातीपासूनच वक्तशीरपणा तसेच आरामदायी प्रवासामुळे मुळे ही गाडी प्रवासी तसेच पर्यटकांमध्ये अत्यंत पसंतीची गाडी ठरत आहे.