लांजा : लांजा तालुक्यातील तळवडे येथे मुंग्यांनी वारूळाच्या माध्यमातून तयार केलेला स्थापत्यशास्त्राचा सुंदर नुमना पाहण्यासाठी जिज्ञासू मंडळींची गर्दी होत आहे. धुळवडीसाठी आलेल्या चाकरमानी आणि निसर्गप्रेमी यांना ही घटना कुतूहलाची वाटत आहे. तळवडे येथे बसक ठिकाणावर मुंग्यांनी ही लक्ष वेधून घेणारी वारुळे बनवली आहेत.
धुळवडीसाठी तळवडे गावची श्री देव गांगेश्वरची पालखी शिमगा झाल्यावर भैरी, बसक, सावंतवाडी, मानकरी घर आदीसह गावातील सर्व वाडीत प्रथेप्रमाणे भेट देते. वरचीवाडी ग्रामस्थ यांनी यावर्षी पाळी असल्याने ज्या ठिकाणी पालखी भेट देते ती ठिकाणे भैरी, बसक येथील परिसराची साफसफाई केली. तसे पहिले तर तळवडे गावाला निसर्गाचे वरदान आहे. तळवडे धबधबा, वनराई बाजूला नदी, रेल्वे स्थानक, कोल्हापूर मार्ग यामुळे तळवडे गावाला विशेष महत्त्व आहे.
वरची वाडीकर यांनी या मुंग्यांच्या वारूळाच्या निमित्ताने स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना म्हणून जतन करून ठेवला आहे.
वारूळ वारूळ मुंग्यांचे वारूळ
कृमी कीटकांनी बांधिले देऊळ
मृत्तिकेचा कण एकेक घेऊन
स्वतंत्र दुर्गम बांधिले भुवन
प्रसिद्ध कवी श्री श्रीकृष्ण पोवळे यांनी लिहलेली ही कविता बालभारतीच्या पुस्तकात बालपणी लोकप्रिय आहे. निसर्गाचे सौदर्य आणि इवलासा कीटक मुंगी आपला उदरनिर्वाह, जगण्यासाठी आणि अन्न साठविण्यासाठी आणि प्रजननासाठी निवारा म्हणून घर तयार करते. मुंग्यांनी बांधलेले हे वारूळ म्हणजे स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुनाच म्हणावा लागतो. मुंग्या जरी आकाराने एवढ्याशा दिसत असल्या , तरी त्या सर्वव्यापी आहेत. वारुळाच्या निमित्ताने त्यांनी माणसाला स्थापत्यशास्त्राचा जणू धडा दिला आहे.

बहुतांश प्रकारच्या मुंग्या घरे करून राहतात. मुंग्यांचे घर असणाऱ्या वारुळाची निर्मिती हे कामकरी मुंग्यांच्या अनेक पिढ्यांच्या श्रमाचे फलित असते. वारुळाच्या आतील भाग बोगदे व सज्जे ह्यांनी व्यापलेला असतो.
या वारुळांच्या रचनेतून माणसाला बरेच काही शिकता येण्यासारखे आहे. वारुळातील वायूविजन (ventilation) व्यवस्था विलक्षण कार्यक्षम असते. त्यामुळे वारुळातील अंतर्भाग उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवला जातो. आकाराने छोट्याशा मुंग्यांनी बनवलेली ही वारुळे बघण्यासाठी अनेक जिज्ञासू मंडळींची पावले आपोआप या ठिकाणी कडे वळू लागलली आहेत.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
