- आषाढी एकादशी २०२४ : चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी भाविकांनी मागणी केल्यास थेट गावातून बस सोडणार!
- आषाढी एकादशीसाठी पाच हजार बसेस सोडणार!
रत्नागिरी : ४० किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी भाविकांनी एकत्रितपणे मागणी केल्यास राज्याच्या कोणत्याही गावामधून आषाढी यात्रेसाठी थेट पंढरपूरला जाण्यारिता बससेवा उपलब्ध करण्याची घोषणा राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आली आहे.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागातून पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये आणि त्यांची आषाढी वारी यशस्वी व्हावी याच्यासाठी एसटी महामंडळाने राज्याच्या कोणत्याही गावांमधून कमीत कमी ४० किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास अशा भाविकांच्या सोईसाठी थेट गावातूनच पंढरपूरला जाण्याकरिता एसटी बसेस उपलब्ध केल्या जाणार आहेत. यासाठी जवळच्या आगारात जाऊन भाविकांनी ग्रुप बुकिंगसाठी आपली मागणी नोंदवायची आहे.
दरवर्षी आषाढी यात्रेसाठी विविध पालख्यांच्या सोबत, खासगी वाहनांनी, रेल्वे मार्गाने विठुरायाचे भक्तगण लाखोंच्या संख्येने पंढरपूरला जात असतात. यावेळी राज्य परिवहन महामंडळाने भाविकांना थेट गावातूनच पंढरपूर यात्रेसाठी बस सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाविकांनी आपल्या नजीकच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास तर महिलांना ५० टक्के सवलतीची योजना लागू
आषाढी एकादशीसाठी एसटी महामंडळाकडून सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांमध्ये ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास तर महिलांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत लागू होणार आहे.
मागील वर्षी एसटी महामंडळाने आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरकरिता ४,२४५ बसेस सोडल्या होत्या. यात्रा कालावधीत १८ लाख ३० हजार ९३४ इतक्या भाविकांची एसटी बसेसमधून सुखरूप ने-आण केली होती.
एसटीच्या राज्यभरातील विविध विभागातून पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूरमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बसस्थानके उभारण्यात आली आहेत.

