मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम :  बँकांनी कर्ज प्रकरणांची उद्दिष्टे पूर्ण करावीत : ना. उदय सामंत

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवण्याचे आवाहन


रत्नागिरी : प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी, व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नव व्यावसायिक, उद्योजकांची कर्ज प्रकरणे सकारात्मतक भूमिकेने मंजूरा करावीत. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योग मंडळाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचवावी, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहातील सभागृहात पालकमंत्री श्री. सामंत यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सर्व बँकांची आढावा बैठक घेतली. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सूर्यकांत साठे आदींसह बँकर्स उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी बँकनिहाय सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले, बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. प्रत्येक शाखा व्यवस्थापकांनी आपला भूतकाळ, इतिहास आठवावा. नोकरीसाठीचा संघर्षदेखील आठवावा. ते लक्षात ठेवून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात येणारी प्रकरणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मंजूर करावीत. समोर कर्ज प्रकरणासाठी येणाऱ्या नवउद्योजकांमध्ये स्वत:ला पहावे. स्वत:चे काम म्हणून प्रकरणे मार्गी लावावीत. खादी ग्रामउद्योग महामंडळाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना घराघरात पोहचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. प्रशिक्षण दरम्यान प्रती दिन मिळणारे 500 रुपये त्याचबरोबर 15 हजार रुपयांचे टुल कीट याचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून द्यावा, असेही ना. उदय सामंत म्हणाले.

विदर्भ कोकण ग्रामीण आणि बँक ऑफ इंडियाचा आदर्श सर्वांनी घ्यावा


मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक प्रकरणे मंजूर करुन उद्दिष्टपूर्ती केली आहे. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. अन्य बँकांनीही याचा आदर्श घ्यावा आणि स्वत:हून पुढाकार घेऊन कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, असेही पालकमंत्री म्हणाले.

महाव्यवस्थापक श्री. हणबर यांनी मागील वर्षाचे आणि चालू वर्षाचा सविस्तर बँकनिहाय आढावा यावेळी दिला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE