- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष
संगमेश्वर ( सुरेश सप्रे ) : बेकायदा वाळू उपशा बाबत जिल्हाधिकाऱ्यानी सर्व तहसीलदारांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या असतानाच संगमेश्वर तालुक्यात मात्र शुक्रवार ते रविवार असा रात्रीच्या वेळी तीन दिवस सक्शन पंपाने बेसुमार वाळूउपसा सुरू असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळनंतर असंख्य रिकामे डंपर वाळू आणण्यासाठी करजुवेच्या दिशेने जात असल्याचे पाहायला मिळते .
शासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवार सुट्टी असल्याने करजुवे खाडीत शुक्रवारी सायंकाळ नंतर सक्शन पंपाने बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्यानंतर कोणतीही कारवाई होणार नाही हे लक्षात घेऊनच हा बेकायदा वाळू उपसा होत आहे. जिल्ह्याच्या उर्वरित भागात बेकायदा वाळू उपशावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले असतानाच संगमेश्वर तालुक्यात मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर दापोली अथवा अन्य ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आली होती. चिपळूण खाडीत बेकायदा वाळू उपसा करणारे सक्षन पंप फोडून टाकण्यात आले होते. करजुवे खाडित मात्र रात्रीच्या वेळी वाळूचे दोनच ढीग सापडल्याने होड्या आणि सक्षन पंप कोठे गेले ? असा सवाल उपस्थित होत आहे. करजुवे खाडीत होणारा बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यानी रात्रीच्या वेळी धाडसत्र सुरू करावे आणि वाळू वाहतूक करणारे डंपर जप्त करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
