नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या 18 वर पोहोचली आहे. यामध्ये 11 महिला आणि 5 लहान मुलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. प्रधान मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक नरसिंह देव आणि प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली पोलिसांनीही तपास सुरू केला असून, चेंगराचेंगरी कशामुळे झाली याचा शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांसाठी मोठ्या संख्येने प्रवासी एकत्र झाल्याने ही दुर्घटना घडली.
जखमींसाठी मदत क्रमांक
एलएनजेपी रुग्णालयाने जखमींकरिता हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत:
9873617028
011-23501207
राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच रेल्वे, गृह आणि संरक्षण मंत्र्यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना गर्दीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
