कोकणातील रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची बनवू

  • कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी  : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला लागून असणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी निधी लागणार असेल तर, कोकण रेल्वेने उद्योग विभागाशी सामंजस्य करार करावा. रत्नागिरीसह कोकणातील रेल्वे स्थानक जगातील चांगली रेल्वे स्थानके करु, असे आश्वासन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.
रत्नागिरी रेल्वे स्थानकात वातानुकुलित विशेष अतिथी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा, माजी आमदार संजय कदम, कार्ययोजना आणि वाणिज्य संचालक सुनिलकुमार गुप्ता, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, उपसरपंच अशोक विचारे, सचीन वहाळकर, प्रादेशिक व्यवस्थापक शैलेश बापट आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरीचे रेल्वे स्थानक विमानतळापेक्षा सुंदर बनले आहे. एमआयडीसीने 40 कोटी दिले आहेत. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागानेही निधी दिला आहे. प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा होत आहेत. मात्र, सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणखी पाच दहा कोटी निधी लागला तरीही एमआयडीसीमार्फत दिला जाईल. पण, मुंबई विमानतळापेक्षाही रेल्वेस्थानके चांगली व्हायला हवीत. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकणातील रेल्वे स्थानके चांगली बनविण्यासाठी मेहनत घेतली आहे.
स्थानिकांना प्राधान्य द्या
स्वच्छ सुंदर झालेल्या रेल्वे स्थानकांवर कोकण रेल्वेने रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे. केवळ चांगली रेल्वे स्थानके बनवत नसून, रोजगारही उपलब्ध करुन दिला जातोय, असा संदेश जायला हवा. पन्हं, कोकम, वाळा सरबत, मोदक अशा कोकणी पदार्थांना आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्यासाठीही कोकण रेल्वेने पुढाकार घ्यावा. कोकणातील रेल्वे स्थानके चांगली करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि उद्योग विभाग तुमच्या सोबत आहे. परंतु, रेल्वे स्थानकांवर शिस्तीचे पालन व्हायला हवे आणि स्वच्छता राखली जावी, असेही पालकमंत्री म्हणाले.
श्री. झा यांनी विमानतळासारखी वातानुकुलित सुविधा प्रती तास 50 रुपयात या विशेष अतिथी कक्षात देण्यात येणार असल्याचे सांगितले.
दीपप्रज्ज्वलन करुन आणि फित कापून वातानुकुलित विशेष अतिथी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

हे देखील वाचा : Konkan Railway |  रत्नागिरी ते उरणच्या जेएनपीटी बंदरात कंटेनर मालवाहतूक सेवा

कलासार्थ चे लोकनृत्य ठरले आकर्षण
रत्नागिरी येथील कलासार्थ समुहाच्या गौरी साबळे, राणी धनावडे, वैष्णवी साळवी, मधुरा कांबळे, ऋता तोडणकर, आस्था खेडकर, रोहित शिंदे, हृतिक कदम व विनीत सनगरे कलाकारांनी ‘देवली माथ्यारती ठेयल्यान, देवली माथ्यारती ठेयल्यान’ या कोकणी लोककला गीतावर समई घेवून अतिशय सुंदर नृत्य केले. हे नृत्य या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. अस्सल कोकणी लोक कला प्रकार सादर केल्याने उपस्थितांकडून वाहवा मिळाली.
कमलाक्ष नाईक यांनी यावेळी स्वागत केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE