खेड : देवरुख येथे नातेवाईकांकडे अंत्यसंस्काराला जात असलेल्या कुटुंबियांवरच काळाने झडप घातली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे येथील जगबुडी नदीपात्रात इर्टिगा कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. चालकासह अन्य एक सुदैवाने बचावला आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या भीषण अपघाताने याच ठिकाणी काही वर्षांपूर्वी जुन्या जगबुडी पुलावरून बस नदीपत्रात कोसळून झालेल्या मोठ्या अपघाताच्या कटू आठवणी जाग्या झाल्या.
मिताली विवेक मोरे, मिहार विवेक मोरे, परमेश पराडकर, मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर ( सर्व रा. मिरा रोड -मुंबई ) अशी मृतांची नावे आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त कारचा पूर्णतः चुराडा होऊन प्रवासी आतमध्येच अडकले होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. सोमवारी पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात घडला.
