- गणेशोत्सवात वंदे भारत एक्सप्रेस हाउसफुल्ल; ३ ऑक्टोबरपर्यंतच्या फेऱ्यांचे प्रतीक्षा यादीवर बुकिंग
रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे रेल्वेच्या इतर गाड्यांबरोबरच अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेसच्या फेऱ्यांना देखील कोकणवासीयांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. मुंबईतून मोठ्या संख्येने गणेश भक्त गावी येणार असल्याने गणेशोत्सवात 15 सप्टेंबरसाठी तर वंदे भारत एक्सप्रेससाठीचे प्रतीक्षा यादीवरील बुकिंग 200 पेक्षा अधिक झाले आहे.
मडगाव ते मुंबई मार्गावर दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ववंदे भारत एक्सप्रेसला कोकणसह गोव्यातील प्रवासी जनतेकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यातील प्रवासी भारमानाचे प्रमाण 95 टक्के इतके आहे. प्रवासी प्रतिसादाचे हे प्रमाण एक वातानुकूलित रेल्वे गाडी चालवण्यासाठी रेल्वेचा उत्साह वाढवणारे आहे.
गणेशोत्सवामधील दहा फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल!
दिनांक 19 सप्टेंबरपासून कोकणात गणेशोत्सव सुरू होत आहे. यासाठी मुंबई, पुण्याहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी येत असल्यामुळे. जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. विशेष म्हणजे महागडे तिकीट अशी ओरड झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसची गणेशोत्सवा दरम्यानची कन्फर्म तिकीटे देखील मिळणे अवघड झाले आहे. गणेशोत्सवात अप-डाऊन मिळून वंदे भारत एक्सप्रेसच्या दहा फेऱ्यांचे आरक्षण आत्ताच फुल्ल झाले आहे.