गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही : उदय सामंत
रत्नागिरी, दि.१३ : चिपळूण येथील वाशिष्टी नदीमधील गाळ काढण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले.
चिपळूण येथील उक्ताड जुवाड येथे वाशिष्टी नदी गाळ टप्पा क्र १ मधील काढण्याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिवाळीमध्ये चिपळूणकरांना दिवाळी भेट द्यावी, यासाठी याकामाचा दिवाळीमध्ये शुभारंभ केल्याचे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, प्रशांत यादव, माजी नगराध्यक्ष सुरेखा खराडे, चिपळूण बचाव समितीचे बापूसाहेब काणे यांच्यासह चिपळूण बचाव समितीचे सदस्य तसेच नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, गाळ काढणे हे आपल्या सर्वांचे प्राधान्य आहे. चिपळूणकरांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना नदीला येणाऱ्या पुरापासून भयमुक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. वाशिष्टी नदीचे गाळ काढण्याचे काम थांबणार नाही. येथील नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील. गाळ काढण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
येथील गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशन या संस्थेने मोठा हातभार लावला आहे. यासाठी आपण नाना पाटेकरांचे आभार व्यक्त करतो असे पालकमंत्री म्हणाले.
आमदार शेखर निकम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
चिपळूण बचाव समितीचे शहनवाज शहा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.