भक्तीमय वातावरणात शेवटच्या श्रावणी सोमवारी भक्तांनी घेतले श्री शंभू महादेवाचे दर्शन
उरण दि 22 (विठ्ठल ममताबादे ): श्रावणी सोमवार म्हणजे भगवान शिवशंकराचा वार. प्रत्येक श्रावणी सोमवारी भगवान शिव शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा अर्चा प्रार्थना केली जाते. भोळा शिवशंकर भक्तांच्या हाकेला धावून येतो व भाविक भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो अशी भाविक भक्तांची श्रद्धा असल्याने श्रावणी सोमवारी प्रत्येक शिवभक्त हे शिवमंदिरात जाउन भगवान शिव चरणी आपला माथा टेकतात. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने उरण मधील भाविक भक्तांनी शिव मंदिरात मोठी गर्दी केली होती.
कळंबुसरे येथील शिवमंदिर, माणकेश्वर, घारापूरी, देऊळवाडी,कोटनाका, आदि उरणमधील शिवमंदिरात गर्दी होती.सर्व भाविक भक्तांनी, शिव भक्तांनी शांततेत, शिस्तीत रांगेत उभे राहून दर्शन घेतले. उरण मधील माणकेश्वर येथील शिवमंदिरात पहाटेपासूनच गर्दी पहावयास मिळाली. भाविक भक्तांसाठी येथे उरण मधील सामाजिक कार्यकर्ते नविन राजपाल यांच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले. भाविक भक्तांनी या अन्नदानाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
मंदिर व्यवस्थापन समिती तर्फेही भाविक भक्तांसाठी उत्तम व्यवस्था यावेळी करण्यात आली होती.भाविक भक्तांना उत्तम सुविधा देण्यासाठी माणकेश्वर देव ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश शरद म्हात्रे, सचिव दिगंबर हरिभाऊ म्हात्रे, पुजारी दत्तात्रय पाटील, तसेच कार्यकर्ते प्रदीप पाटील, संजय म्हात्रे,सचिन मोकल, संतोष पेढवी, हर्ष पाटील, समीर काठे, दीपक राऊत, प्रीतम शरमकर, पांडूभाई पाटील,मनोहर पाटील, जितेंद्र म्हात्रे, नितीन कोळी यांनी अपार मेहनत घेतली.