- प्लेग दरम्यान झाले होते स्थलांतर
- महापुरानंतर दृष्टिक्षेपात वस्ती
- कंसाई नेरोलॅक पेंट्स चे सामाजिक उत्तरदायित्व
- उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तरतर्फे अन्नपूर्णा प्रकल्प
- आजही होते दरवर्षी चार महिन्यासाठी स्थलांतर
चिपळूण दि.३ ( राजेश जोष्टे ) : पहिल्या महायुद्धाच्या कसाट्यातून जगाची मुक्तता झाली आणि लगेचच प्लेग च्या महामारीने हाहाकार उडवला. यादरम्यान, माणसं माणसांपासून दूर वस्ती आणि गाव सोडून जाऊ लागली. याच दरम्यान जागतिक मंदीचे संकट सर्वदूर पसरलं आणि जगण्यासाठी अन्न हेच दुरापास्त झालं. अशा पार्श्वभूमीवर काही भूमिहीनांचे स्थलांतर हे सर्वात वेदनादायी ठरले. प्लेगमधून वाचण्यासाठीच नव्हे तर जगण्यासाठीचे स्थलांतर झालं. आता दोन महापुराच्या तडाख्यानंतर दरवर्षी पावसात होणारे चार महिन्यासाठीचे स्थलांतर.. आपत्तींच्या या चक्रव्यूहात अभिमन्यू न होता मिळालेल्या सहकार्यातून अपारकष्ट आणि दुर्दम्य ध्येयनिष्ठेने आपत्तीच्या त्या बेटाचा प्रवास ..समृद्धीचे बेट बनण्याकडे सुरू झाला आहे त्याचीच ही चित्तरकथा !
पहिले महायुद्ध १९१९ ला ते समाप्तीकडे जाऊ लागले. या दरम्यान भारतामध्ये प्लेग ने उच्छाद सुरू केला. माणसं माणसांपासून दूर जाऊ लागली. गाव- वस्ती सोडून रानावनात व निर्मनुष्य नदीकाठी जगण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. अशातच तिसरं संकट हे जागतिक मंदीच्या रूपाने सर्वदूर पसरलं आणि जगण्यासाठी अन्न हेच दुरापास्त झालं.

शंभर वर्षांपूर्वीच पाऊल
याच दरम्यान चिपळूण तालुक्यातील कोंढे गावातील काही भूमीहीन कुटुंब ही वाशिष्ठी नदीने चहुबाजूने वेढलेल्या बेटावर कशीबशी आली. सुरुवातीला गुरे चरवण्यासाठी आलेली मंडळी प्रारंभिक गुरांचे गोठे व नंतर राहुट्या उभारुन राहू लागली. हळूहळू इतर काही कुटुंब पुढील काही वर्षांमध्ये आली. जगण्यासाठी थोडीफार शेती त्यासाठी गुरे, नांगर अशी शेती साधने सोबत घेऊन जगण्याचा प्रवास सुरू झाला. प्लेग चा धोका ओसरल्यानंतर प्रारंभिक रात्र वस्तीला येथे फार कोणी राहत नसे. हळूहळू वस्ती विस्तारित गेली. पण या बेटावरच पहिल पाऊल हे शंभर वर्षांपूर्वीच पडलं होतं.

बेटावरचा एकाकी संघर्ष
शेती आणि शेतीपूरक व्यवसायात रमलेले आणि जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या इथल्या माणसाची नोंद कुणीच घेतली नव्हती. खरंतर चिपळूण शहरापासून अगदी लगत असणाऱ्या मिरजोळी गावांमधील या बेटावर यायचं तर होडी शिवाय दुसरं साधन नव्हतं. शहरात गेलेला माणूस नदी पल्याड येऊन हाका मारत राहायचा. जर कोणाला हाक ऐकू गेली तर बेटावरिल माणूस पैल तीरावर होडी घेऊन जायचा. शहरालगत असणारी ही वस्ती पण फारसा कुणाला मागमूस नसलेली.
महापुराच्या तडाख्याने उध्वस्त
शंभर वर्षांपूर्वी जुवाड बेटावर भूमीहीन शेतकऱ्यांचं पहिलं पाऊल पडलं. आणि विशेषता गेल्या ७० वर्षांमध्ये स्थापित झालेलं. इथल्या शेतकरी आणि विशेषत: वस्तीकडे लक्ष गेलं ते २००५ च्या महापुरावेळी. चिपळूण शहर बुडालं अपरिमित हानी झाली आणि याच वेळी काहींना आठवलं ते नदीपात्रातच बेट बनलेल्या आणि पाण्याने चहुबाजूने वेढलेल्या या वस्तीचं काय झालं असेल याचं ? चिपळूण शहरांमध्ये जर महापुराने हाहाकार उडवला असेल तर या वस्तीवर कोण वाचलं असेल काय? हीच शंका सगळ्यांना होती. महापुराने अर्थातच या वस्तीला प्रचंड दणका दिला. शेती, घरे यांचं अपरिमित नुकसान झालं. एका उंच घराच्या माळ्यावर आसरा घेतल्याने माणसं वाचली. या मोठाल्या संकटातून सावरत असतानाच २०२१ च्या महापुरानं उरलंसुरलं सारं काही पोटात घेतलं. चिपळूण शहरातील मध्यवर्ती एसटी स्थानकातील गाड्या पूर्णतः बुडाल्या. अशावेळी नदी पात्रातच असलेल्या या बेटाचं काय झालं असेल याची कल्पनाच कुणाला करवत नव्हती. आता मात्र जुवाड वाचत नाही. याच्या भयकल्पनेने सगळेच हादरले. या बेटावरील काही घरे, गोठे याच्यासह गाई गुरे म्हशी यासारखी पाळीव प्राणी शेकडो कोंबड्या शेती विषयक साधनसामुग्री असं सारं काही महापुरानं गिळंकृत केलं. पण प्रसंगावधान राखून संरक्षित ठिकाणी आसरा घेतल्याने केवळ दैव बलवत्तर म्हणून माणसं सुरक्षित राहिली.

नेरोलॅकचे सामाजिक उत्तरदायित्व!
या साऱ्या संकटाच्या आणि अडचणीच्या तडाख्यात शेतीचं जमिनीचं पाळीव पक्षी, पशुधनाचा अपरिमित नुकसान झालं. शेत जमिनीवर पुरामुळे आलेला गाळाचा राब, वाळू, रेती या अशा अनेक कारणाने जमिनीची सुपीकता रसातळाला गेली. या साऱ्यातही संकटामध्ये जर थोडाफार सहकार्य मिळू शकलं तर पुन्हा नव्या जोमानं आणि जिद्दीनं उभे राहू या प्रामाणिकपणाने व्यक्त झालेल्या भावनांना दिशान्तर संस्थेच्या माध्यमातून कंन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्याचा स्नेहार्द हात देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अन्नपूर्णा प्रकल्प निर्मिती
गत एका तपापासून दिशान्तर संस्था शेतीमध्ये महिला शेतकरी गटां समवेत काम करत आहे. याच पद्धतीने इथे प्रारंभिक वाडी बैठक घेऊन आलेले या संकटाचा मुकाबला कसा करायचा याची चर्चा करण्यात आली यातून पुढे आलेल्या सकारात्मक मुद्द्यांवर अन्नपूर्णा प्रकल्पाची निर्मिती या वस्तीवर करण्याचे निश्चित करण्यात आले. रब्बी हंगामाचे नियोजन गतवर्षीच करण्यात आले. सावित्रीबाई शेतकरी स्वयंसहाय्यता गट या नावाने शेती गटाची निर्मिती करण्यात आली. तर पुरुषांचा सावता माळी या नावाने गट बनविण्यात आला.
नैसर्गिक खते व फवारणी निर्मिती
नेरोलॅक कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख यांच्या संपूर्ण सहकार्याच्या भूमिकेतून सर्वतोपरी सहकार्याचा निर्णय वर्षांपूर्वी वाडी बैठकीत झाला. त्यानुसार एक धोरण निश्चिती करून टप्प्याटप्प्याने विविध स्तरावरचे कामे हाती घेण्यात आली. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी नैसर्गिक खते निर्मिती, पिकाचा दर्जा वाढवण्यासाठी जीवामृत, गांडूळ खत, दशपर्णी अर्क अशी नैसर्गिक खते व फवारणी या सगळ्याचे प्रशिक्षण आणि मुख्य म्हणजे याची निर्मिती चे अव्याहत काम सुरू झाले. आत्मा चे व्यवस्थापक पंकज कोरडे यांनी या संदर्भाने सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले.
गावठी भाजीपाला रोपे वितरण
गावठी वेलवर्गी वांगी, मिरची रोपे यासाठी कोकोपीट मध्ये रोपे निर्मिती सुरू झाली. या जोडीने १२ हजार भाजी रोपे ही गुरुब्रह्म हायटेक नर्सरीतून आणून या अन्नपूर्णा प्रकल्पावरील शेतकऱ्यांना देण्यात आली.

शेतीसाठी बी बियाणे
जमिनीचा पोत व लागवड योग्य पद्धतीचा अवलंब त्याचे मार्गदर्शन तसेच रासायनिक खते फवारणी टाळून नैसर्गिक तथा विषमुक्त शेती संदर्भाने अत्यंत प्रामाणिकपणे हे काम सुरू झाले. समूह व वैयक्तिक शेतीसाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारच्या बी बियाणांचे वितरण करण्यात आले. यामध्ये भेंडी, काकडी, मिर्चि, विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, मका अशा एक लाख रुपये किंमतीच्या बियाण्याचा समावेश होता.
परसबाग निर्मिती
अन्नपूर्णा प्रकल्प स्थळावर शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्या दृष्टिकोनातून कामास प्रारंभ करण्यात आला होता. याचाच दुसरा भाग म्हणून प्रत्येक घराच्या पाठीमागील परसबागा समृद्ध करण्या दृष्टिकोनातून विविध फळांच्या रोपांची नर्सरीतून मागणी करण्यात आली. त्यानुसार फळे, फुले, वनस्पती अशा तीन स्तरांवर झाड रोपांचे वितरण करण्यात आले.

शेतीपूरक साहित्य
नैसर्गिक शेतीच्या संदर्भाने विविध प्रकारचे ड्रम्स, सेंद्रिय खत निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती बॅग्स, २० किलो गांडूळ, जल व्यवस्थापनासाठी पाईप, भाजीतील टिकाऊपणा वाढवण्यासाठी मोठाला सब्जी कुलर अशा साहित्याची व्यवस्था करण्यात आली. या सर्व उपक्रमावेळी कंपनीचे वरिष्ठ मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख, लोटे येथील प्लांटचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक नंदन सुर्वे, वर्क्स मॅनेजर जयवर्धन यांच्यासह दिशान्तर संस्थेचे राजेश जोष्टे, सीमा यादव, शर्वरी कुडाळकर, वाडीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती राहिली.
शेतीतून समृद्धीकडे!
आपत्तीचे बेट बनलेल्या पण परिस्थिती पुढे संघर्ष करून त्यावर मात करण्याची वृत्ती अंगी असलेल्या या इथल्या शेतकऱ्यांना संपूर्ण सहकार्याचा निर्णय कंन्साई नेरोलॅक पेन्टस लिमिटेड कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व यातून झाला. विविध प्रकारची कृतीयुक्त प्रशिक्षणे, सातत्यपूर्ण सेंद्रिय खत निर्मिती, शेती साधने, बी-बियाणे यांची शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्धता, समृद्ध बाग परसबाग निर्मिती.. याशिवाय; सावित्रीबाई महिला शेतकरी गटाला खेळते भांडवल म्हणून दिलेला एक लक्ष रुपयांचा धनादेश. नेरोलॅक कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वातून केलेल्या संपूर्ण सहकार्यावर शेतकऱ्यांनी पहिल्याच हंगामात केलेली लक्षावधींची उलाढाल हे सारे चित्र बेटावरील लोकवस्तीसाठी सकारात्मक ठरले आहे. आपत्तीचा पाठशिवणीचा सुरू झालेला खेळ ससेमिरा सोडायला तयार नसताना त्या साऱ्या प्रसंगात अपार कष्ट आणि जिद्दीने उभा ठाकणाऱ्या या बेटाची वाटचाल समृद्धीकडे सुरू झाली आहे हे सांगायला कुणा भविष्यवेत्याची गरज नाही.
शेती सर्वेक्षण
प्रत्येक शेत आणि शेतकरी निहाय पिकाखाली आणलेल्या शेतीचे क्रॉप डॉक्टर सल्लागार या एजन्सी तर्फे सर्वेक्षण करण्यात आले. अॅग्रीकल्चर क्षेत्रात दोन वेळा सुवर्णपदक विजेते आणि कृषीतील विद्यावाचस्पती आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक सोमनाथ पाटणकर यांनी इथल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. शेत सर्वेक्षणाचा अहवाल संस्थेकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार शेतीतील बदल तसेच पीक व इतर उपाययोजना या नव्या हंगामामध्ये अंमलात आणल्या जाणार आहेत.

उत्पादनात कमालीची वाढ
आपत्तीने पिचलेल्या आणि संकटांनी घेरलेल्या जुवाड बेटावरील शेतकऱ्यांची लढाऊ कृती व शेतीतून जगण्याची वृत्ती आणि संकटातही न डगमगता वाटचाल करणाऱ्या त्यांच्या या सकारात्मक भूमिकेला कन्साई नेरोलॅक कंपनीने सहकार्याचा स्नेहार्द हात दिला. उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर या संदर्भाने काम सुरू केले आणि पहिल्या हंगामात क्षेत्र विस्तार याचबरोबर राबवलेल्या पीक पद्धती आणि शेतकऱ्यांचे कष्ट या साऱ्यामुळे शेत उत्पादनात कमालीची वाढ मिळाली आहे. साहजिकच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. गत तीन महिन्यात पाच लाखावून अधिक रक्कमेची उलाढाल या वस्तीवर झाली आहे. जून पर्यंत याचा एकूणच उलाढालीचा ठोकताळा स्पष्टपणे समोर येईल.
- हे सुद्धा वाचा : मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली!
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
