कोल्हापूर विभागात अडीच लाख परीक्षार्थी घेणार कॉपी न करण्याची शपथ!

  • विभागीय मंडळाकडून शाळास्तरावर बोर्ड परीक्षेचा अनोखा जागर

रत्नागिरी : येत्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या कोल्हापूर विभागातील सुमारे २ लक्ष ४८ हजार ६६० इतक्या परीक्षार्थींना त्यांना चालू डिसेंबर महिन्यात शाळास्तरावर आणि फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षाकेंद्र स्तरावर कॉपी न करण्याची शपथ देण्यात येणार आहे. शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्यासह संबंधित सर्व घटकांना परीक्षेची इत्यंभूत माहिती व्हावी, यासाठी विभागीय मंडळांने शाळा स्तरावर चालू वर्षी प्रथमतःच बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानिमित्ताने २४ डिसेंबरपर्यंत शाळा स्तरावर बोर्ड परीक्षेचा जागर होत आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर सातारा येथे ११, सांगली येथे १२ आणि कोल्हापुर येथे १७ डिसेंबर रोजी बोर्ड परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सर्व शाळाप्रमुखांची ऑफलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेशी संबंधित सर्व मुद्द्यांची माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली. एवढेच नव्हे तर कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त परीक्षा आयोजनासाठी कडक कारवाईच्या सूचना आणि गुणात्मक सुधारणेसाठी परीक्षेशी संबंधित आवश्यक माहिती व सर्व घटकांची मानसिकता बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.

कोल्हापूर विभागातील तिन्ही जिल्ह्यात २४३५ माध्यमिक शाळांमधून तर १००४ उच्च माध्यमिक अशा एकूण ३४३९ विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत. त्यातून इयत्ता दहावी करिता १ लाख ३२ हजार ४५६ आणि इयत्ता बारावी करिता १ लाख १६ हजार २०४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.

शाळास्तरावर घ्यावयाच्या बैठकीसाठी विभागीय मंडळांने आवश्यक माहितीची पीपीटी आणि शासन निर्णय-परिपत्रकांची रसदच शाळांना पुरवली आहे. तसेच १८ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे शाळा प्रमुखांना विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

पत्रात जिल्हा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनानुसार आवश्यक ती कार्यवाही शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करावी. अभ्यासाची उजळणी घेणे, प्रश्नपत्रिका सराव घेणे व उद्बोधन वर्ग घेणे, परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची बैठक दि.२०/१२/२०२४ ते दि.२४/१२/२०२४ या कालावधीत कोणत्याही एका दिवशी आयोजित करुन पीपीटीच्या सहाय्याने योग्य त्या सूचना देणे, तसेच कॉपीमुक्त अभियानाबाबत उद्बोधन करणे, बैठकीचे उपस्थितीपत्रक व इतिवृत्त जतन करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश आहेत.

शिवाय बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीच्या शिक्षासूचीचे, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्टामागील सुचनांचे वाचन, तसेच मंडळाने सुचविलेल्या नमुन्यात ‘परीक्षेत गैरमार्ग करणार नाही’ अशा आशयाची शपथ / प्रतिज्ञा शाळाप्रमुखांनी शाळास्तरावर देण्याबाबत सूचना आहेत. राज्य मंडळ व विभागीय मंडळाकडे असलेल्या सुविधा व योजनांची माहिती देण्याचेही निर्देश आहेत.

तसेच लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्र संचालकांनी परीक्षाकेंद्र स्तरावर शपथ देणे, शाळा प्रमुखांनी चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करीता नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहिती, संकेतांक नुतनीकरण शुल्कासह प्रस्ताव यांची पुर्तता दि.३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत करावी. नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहितीची पुर्तता मुदतीत प्राप्त न झाल्यास परीक्षाच्यांची प्रवेशपत्रे अशा शाळांना उपलब्ध होणार नाहीत. त्याची जबाबदारी संबंधित
शाळाप्रमुखांवर निश्चित होईल. त्यामुळे होणा-या विद्याथ्यांच्या संभाव्य शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी शाळा प्रमुखांवर निश्चित करण्यात आली आहे.

कॉपीमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यासह परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा स्तरावर प्रबोधन आवश्यक आहे, अन्यथा दुसऱ्या टप्प्यात कारवाई करणे अटळ आहे.
राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ.

दिव्यांग विद्यार्थी प्रस्ताव, आवेदनपत्र रद्द प्रस्ताव, चित्रकला/ शास्त्रीय कला, लोककला प्रस्ताव, खेळाडू प्रस्ताव, अतिविलंब आवेदनपत्रे इत्यादी मंडळ कार्यालयास विहित मुदतीत सादर करावेत.
पुढील काळात विभागीय मंडळाकडून शाळाप्रमुखांसाठी आवश्यकतेनुसार ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आहेत, त्यास शाळाप्रमुखांनी आवश्यक
माहितीसह स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
राज्यमंडळाच्या व विभागीय मंडळाच्या संकेतस्थळास नियमितपणे पाहणे आणि. शिवाय मंडळाच्या MSBSHSE या ॲपचा वेळोवेळी उपयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रतिज्ञा / शपथेचा नमना


मी…. या शाळेचा/ची कनिष्ठ महाविद्यालयाचा/ची विद्यार्थी/ विद्यार्थिनी आजच्या दिवशी अशी शपथ घेतो/घेते की, मी फेब्रुवारी-मार्च२०२५ च्या इयत्ता दहावी/बारावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेसाठी गैरमार्गाचा विचारही करणार नाही.
जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. सातत्याने अभ्यास करेन. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन.परीक्षेस मोठ्या आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणाव विरहित सामोरे जाईन. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे/ कनिष्ठ महाविद्यालयाचे, गुरुजनांचे, आई-वडिलांचे नाव उज्वल करेन.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE