देवरुख : पत्रकार कै. विलास होडे यांचा १५ वा स्मृतिदिन १ जुलै रोजी देवरुख येथे सकाळी १०.३० वाजता कुणबी भवन देवरुख येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रविंद्र माने, माजी आमदार सुभाष बने अविनाश लाड, राजन देसाई, प्रकाश कांबळे, बाळासाहेब पाटणकर, सुरेश भायजे, अभिजीत हेगशेट्ये, संजीव अणेराव, चंद्रकांत परवडी, राजन इंदुलकर आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी विलास होडे यांच्या कार्यावर आधारित २०० पानी रंगीत गौरव ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार असून विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन युयुत्सु आर्ते , शांताराम भुरवणे, सुरेश पातेरे यांनी केले आहे.
स्मृतिदिन कार्यक्रमानिमित्त पत्रकार विलास होडे यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख खास आमच्या वाचकांसाठी….!
सत्यासाठी झगडणारा पत्रकार : विलास होडे
▪ जे . डी . पराडकर jdparadkar@gmail.com
बदलत्या काळात संपर्काची वेगवान माध्यमे उपलब्ध झाल्याने जगात कोठे काही घडले तर , क्षणात ती बातमी आपल्या पर्यंत पोहचते . मात्र ज्या काळात इंटरनेट सुविधा अथवा साध्या फोनची देखील सुविधा उपलब्ध नव्हती अशा काळात पत्रकारिता करणे हे एक मोठे आव्हान होते . समोर आव्हाने उभी रहाणार आहेत याची पूर्ण कल्पना असताना देखील सामाजिक दायित्व महत्वाचे मानून अन्यायाला वाचा फोडणारी सातत्यपूर्ण पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांमध्ये विलास होडे यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल . पत्रकारिता करताना ती व्यक्तिची अथवा कोणत्याही राजकीय पक्षाची भलावण करणारी असू नये, हे व्रत विलास होडे यांनी नेहमी पाळले . सामाजिक अथवा राजकीय तडजोडी न केल्याने होडे हे नेहमीच ताठ मानेने जगले . स्पष्ट बोलणारा मात्र मनात काही न ठेवणारा पत्रकार म्हणून विलास होडे यांची संगमेश्वर तालुक्याला ओळख होती. त्यांच्या हातून आणखी मोठे कार्य घडण्याची अपेक्षा असताना अचानक होडे यांचे अपघाती निधन झाले आणि तालुक्याची लेखणी अक्षरशः बोथट झाली. विलास होडे यांच्या अपघाती निधनामुळे समाजासह पत्रकारितेची कधीही भरुन न येणारी हानी झाली.
मध्यम उंची , कुरळे केस , हातांना दुरमडलेला फुल शर्ट , हातात डायऱ्या, बातम्यांचे कोरे कागद आणि पेपरच्या नावांचे लिफाफे , सतत धावपळ , हसतमुख चेहरा , विशिष्ट टोपणनावाने हाका मारण्याचा मिश्किल स्वभाव , जबरदस्त वाचन, शैक्षणिक कार्य, प्रयोगशील शेतकरी , तालुक्याचा भूगोल आणि इतिहास तोंडपाठ , समाजाच्या उन्नतीसाठी सातत्यपूर्ण धडपड, राजकीय नेतेमंडळी आणि राजकीय पक्ष यांच्या विरोधात जावून सत्य लिहिण्याची धमक , निर्भीड आणि अभ्यासू असे एक ना अनेक पैलू विलास होडे यांच्या मध्ये ओतप्रोत भरलेले होते. संगमेश्वर तालुक्यात विलास होडे यांच्या काळात मोजून सात – आठ पत्रकार होते. पत्रकार कसा असायला हवा ? याबाबत समाजाच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षा पूर्ण करणारी पत्रकारिता त्याकाळी चालत होती पत्रकारांनी देखील जरी आपले विचार आणि मतप्रवाह वेगळे असले तरीही एकत्र असायला हवे या हेतून तत्कालीन ज्येष्ठ पत्रकार डॉ. एम. डी . शेकासन यांनी संगमेश्वर तालुका पत्रकार संघाची अधिकृत नोंदणी करुन घेतली. या मध्ये विलास होडे , नरेश सप्रे , प्रशांत कोकाटे, विष्णू जाधव, संजीव अणेराव, शिरीष दामले सुरेश सप्रे अशा दिग्गज मंडळींचा समावेश होता. त्याकाळात संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे काम हे आदर्शवत असेच होते.
संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही विलास होडे यांनी खूप काळ काम पाहिले. जानेवारी महिन्यात असणाऱ्या पत्रकार दिनाच्या दिवशी संगमेश्वर तालुका मेडिकल असोसिएशन आणि पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात वाडी वस्तीवर आरोग्य तपासणी आणि मोफत औषध उपचार असे उपक्रम राबविले जायचे . ज्या गावांच्या आसपास दवाखाने नाहीत , औषध दुकाने नाहीत अशा ठिकाणी ही आरोग्य शिबीरे घेण्यासाठी होडे नेहमी आग्रही असायचे. स्वतःची वेगळी यंत्रणा राबवून विलास होडे या आरोग्य तपासणी उपक्रमाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा म्हणून आठवडाभर सातत्यपूर्ण संपर्क ठेवून असायचे. या शिबीराचा लाभ घेणाऱ्यांची संख्या चारशेच्या घरात गेली की, विलास होडे यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळायचा . मात्र, या साऱ्याचे श्रेय ते डॉक्टर मंडळी आणि पत्रकार मित्रांना देत. पत्रकार संघातर्फे शाळांमधून मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचे कार्यक्रम देखील संपन्न होत. डोंगर दऱ्यातील शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब आणि होतकरु मुलांना असे शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर तरळणारा आनंद पाहून विलास होडे यांचे नेत्र भरुन येत. पत्रकार संघातर्फे असे विविध कार्यक्रम राबवून देखील ज्यावेळी तालुका पत्रकार संघाची बैठक संपन्न होत असे , त्यावेळी आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत आपण या पदाला अपेक्षित न्याय देवू शकलो नाही असे स्पष्ट करुन स्वतःकडे कमीपणा घेत. मोठे कार्य करुनही पाय जमिनीवर घट्ट रोवून ठाम उभे रहाण्यासाठी विलास होडे यांच्या सारखे हृदय आणि स्वभाव असावा लागतो.
राजकारणात नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता विलास होडे यांच्याकडे होती . तालुक्यात राजकारणाच्या माध्यमातून विकास साधण्याच्या दृष्टीने होडे प्रयत्नशील देखील होते. मात्र एवढा स्पष्ट बोलणारा आणि तत्वनिष्ठ माणूस राजकीय पक्षांनाच काय, स्वकीयांनाही नको असतो . विलास होडेंच्या बाबतीत नेमके असेच घडले.तालुका पंचायत समितीचे सभापती पद भूषविण्याची क्षमता असणाऱ्या या माणसाला पंचायत समितीच्या मतदार संघात स्वतःच्या मूळ गावी आणि स्वतःच्या समाजाचे मतदान अधिक असताना देखील पराभव पत्करावा लागला . हा पराभव त्यांनी सहज स्वीकारला असला तरी , तो त्यांच्या जिव्हारी लागला . यामुळे काही गोष्टींवरील त्यांचा विश्वास उडाला होता. अखेरीस हे सारे विसरुन त्यांनी परत एकदा आपला मोर्चा पत्रकारिता आणि शेती याकडे यशस्वीपणे वळवला. शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी होडे यांचा दिवस सकाळी सहा वाजताच सुरु व्हायचा. नांदळज येथे त्यांनी अक्षरशः नंदनवन फुलवले. कृषी अधिकाऱ्यांसह अनेक शेतकरी होडे यांचे आधुनिक शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी नांदळज येथे जात असत . विशेष म्हणजे शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन प्रसंगी बी बियाणे देण्यात होडे यांनी कधीही आपला हात आखडता घेतला नाही . विलास होडे यांचे जीवन तसे संघर्षमयच गेले. अन्याय झाल्यानंतर त्यांची लेखणी अशी काही तळपायची की, त्यांच्या बातम्यांची प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागे. तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यातील कोळसा भट्ट्या बंद व्हाव्यात आणि जंगल माफियांवर कारवाई व्हावी म्हणून पत्रकार संजीव अणेराव यांच्या सह अन्य पत्रकार बांधवांच्या सहकार्याने विलास होडे यांनी मोठे आंदोलन उभे केले. या आंदोलनाचा सकारात्मक परिणाम होवून शासनाला या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी लागली. एखादे आंदोलन हाती घेतले तर , योग्य तो न्याय मिळेपर्यंत होडे कधीही मागे हटले नाहीत.
कष्टकरी बांधवांची मुले शिकली पाहिजेत याबाबत विलास होडे यांना कमालीची तळमळ होती . सह्याद्रीच्या खोऱ्यातील मुले शिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सातवी नंतर शिक्षणापासून वंचित रहात असल्याची बाब जेंव्हा होडे यांच्या लक्षात आली , त्यावेळी त्यांनी नायरी, शृंगारपूर, निवळी , नेरदवाडी , अणदेरी , कोंड आदि गावे आणि वाड्यांसाठी कारभाटले येथे प्रचितगड माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली . सह्याद्रीचा मुकुटमणी म्हणून ओळखला जाणाऱ्या अजिंक्य अशा प्रचितगडाचे नाव शाळेला देवून त्यांनी मोठी कल्पकताही दाखवली . या शाळेच्या स्थापनेनंतर अनुदान मिळावे म्हणून त्यांनी मुंबईत शिक्षण विभागात अनेक खेपा मारल्या , पत्र – निवेदने दिली आणि अखेरीस शाळेला अनुदान मंजूर करुन घेतले. शाळेसाठी एवढे प्रयत्न करुनही कोठेही आपल्या नावाचा गवगवा विलास होडे यांनी केला नाही . विविध प्रकारचे सामाजिक कार्य करुनही होडे यांनी याचे श्रेय कधीही स्वतःकडे घेतले नाही. चालत , सायकलने अथवा कोणाच्या दुचाकीने प्रवास करत हा माणूस आपल्या नियोजित कामापर्यंत पोहचायचा. अशाच सामाजिक कामासाठी जीपने मुंबईला जात असताना महाडच्या पुढे या जीपला अपघात झाला आणि या अपघातात आपली लेखणी कधीही न झुकवलेल्या जिद्दी आणि स्पष्टवक्ता असणाऱ्या पत्रकार विलास होडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने समाजाचे, शेतकऱ्यांचे, पत्रकार संघाचे, शैक्षणिक क्षेत्राचे कधीही भरुन न येणारे नुकसान झाले. सध्या सुरु असणारी पत्रकारिता पाहिली की, सत्यासाठी निर्भीडपणे लेखन करणाऱ्या विलास होडे यांची पावलोपावली आठवण येते.














