अलिबाग : ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा दि.२ व ६ जून २०२३ रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी काल (दि.13 मे ) रोजी रायगड किल्ल्यावर प्रत्यक्ष स्थळपाहणी तर महाड येथील बी.एस.बुटाला सांस्कृतिक भवन येथे आढावा बैठक आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी प्रशासन आणि समितीने आपल्या राजाचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात संपन्न करण्याचा संकल्प केला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, कार्यकारी अभियंता श्री. महेश नामदे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, महाड प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, तहसिलदार विशाल दौंडकर, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे सुनिल पवार, फत्तेसिंह सावंत, सुरेश पवार तसेच विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिवराज्याभिषेक समितीचे व कोकण कडा संस्थेचे, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक समितीचे पदाधिकारी, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते.
शासनाने हा सोहळा अत्यंत भव्य स्वरूपात आणि दिमाखात आयोजित करण्याचा संकल्प केला आहे. या सोहळ्याच्या यशस्वी नियोजनाकरिता जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक व्यवस्थापन समितीचे गठन करण्यात आले आहे.
या समितीत मंडप, वीज पुरवठा , विद्युत जोडणी, गर्दी नियंत्रण, अग्निशमन, वैद्यकीय, पाणीपुरवठा, स्नानगृह व शौचालय, कचरा संकलन व विल्हेवाट, परिवहन, पार्किंग, रोपवे, रस्ते , सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रम प्रसिद्धी , मोबाईल नेटवर्क , पोलीस बंदोबस्त, पोलीस मदत केंद्र, परवानगी समिती , भटके गायी व भटके श्वान नियंत्रण, हेलिपॅड , ओळखपत्र समिती , सर्पमित्र समिती , दिशादर्शक फलक समिती , खानपान आणि आपत्ती व्यवस्थापन समिती अशा विविध विषयांच्या व्यवस्थापन समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागाचे विभाग आणि कार्यालयप्रमुखांना त्या-त्या समित्यांचे प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक विभाग प्रमुखांनी आणि कार्यालय प्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या या अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीत प्रत्येक विभागाने या सोहळ्याच्या अनुषंगाने आपापल्या विभागाच्या दृष्टीने कामकाजाचे काय नियोजन केले आहे, याचे संगणकीय सादरीकरण संबंधित विभाग/कार्यालयप्रमुखाने केले. या सादरीकरणाच्या अभ्यासांती शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काही आवश्यक बदल व सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्या.
सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी या निमित्ताने उपस्थिताना राज्याभिषेक सोहळ्याचे भव्य असे दिमाखदार सांस्कृतिक सादरीकरण कशा पद्धतीने केले जाणार आहे याविषयी सादरीकरण केले. तर आपत्ती व्यवस्थापन तज्ञ कर्नल सुपणेकर यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच “आपत्ती व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण व सुनियोजन” याबाबत कशा पद्धतीने खबरदारी घेण्यात यावी, काय उपाययोजना राबविण्यात याव्यात याविषयी सर्वांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्वांनी अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन अत्यंत दिमाखदार पद्धतीने करून हा सोहळा यशस्वी करण्याचा निर्धार केला.
