कोकण रेल्वे मार्गे धावणार आणखी एक महाकुंभ स्पेशल ट्रेन

रत्नागिरी : प्रयागराजमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळयासाठी गोवा सरकारने त्यांच्या राज्यातील भाविकांसाठी तीन विशेष गाड्यांची घोषणा केल्यापाठोपाठ कर्नाटकमधून उडपी स्थानकावरून प्रयागराजसाठी 17 फेब्रुवारीला गाडी सुटणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावरून धावताना मडगावनंतर ही गाडी रत्नागिरी, चिपळूण तसेच रोहा स्थानके घेत कल्याण, नाशिकमार्गे प्रयागराजला रवाना होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या गाडीला एकही थांबा दिला न गेल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या खासदारांनी या संदर्भात आधीच रेल्वेकडे पत्रव्यवहार करूनही रेल्वेने सिंधुदुर्गबाबत दुजाभाव दाखवला आहे.

काही दिवसांपूर्वीच गोवा सरकारने त्यांच्या राज्यातील भाविकांसाठी प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यासाठी तीन गाड्यांची घोषणा केली. मात्र या गाड्या एफटीआर स्पेशल गाड्या असल्याने केवळ गोवा राज्यातील तीन स्थानकांवर प्रवाशांना घेऊन परत आणण्यासाठी या गाड्यांचे विशेष नियोजन गोवा सरकारने केले आहे.

नव्याने जाहीर झालेली कर्नाटकमधील उडुपी ते प्रयागराजसाठी 01192/01191 दि  १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सुटणारी गाडीही फक्त कर्नाटक राज्यातील भाविकांसाठी नसली तरी गोव्यानंतर ही गाडी कोकण रेल्वे मार्गावर केवळ रत्नागिरी, चिपळूण आणि रोहा हे तीनच थांबे घेणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा देखील लागतो, याचा कोकण रेल्वेला विसर पडला आहे.

महाराष्ट्रात थांबे देताना कोकण रेल्वेचा हात आखडता

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच लोकसभेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या महाकुंभ स्पेशल गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबे देण्याची मागणी केली होती. कोकण रेल्वेने या मागणीकडे काणाडोळा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या महाकुंभ स्पेशल गाडीला एकही थांबा देण्यात आलेला नाही. त्यापुढे जे थांबे देण्यात आलेले आहेत त्यामध्ये रत्नागिरी ( क्रू चेंज ), चिपळूण ( गाडीत पाणी भरणे ), रोहा ( गाडी दुसऱ्या झोनकडे सुपूर्द करणे ) या कारणामुळे रेल्वेला त्या थांबवाव्याच लागत असल्याने देण्यात आलेले थांबे अपरिहार्य आहेत. त्या व्यतिरिक्त सिंधुदुर्गात एकही थांबा न देणे याचबरोबर राजापूर, संगमेश्वर, खेड स्थानकात थांबा न दिल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE