NH-66 | महामार्गावर गतिरोधक दर्शक फलकांअभावी आरवलीत दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना
रत्नागिरी : मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावर आरवली येथे सर्व्हिस रोडवर टाकण्यात आलेल्या गतिरोधकांच्या ठिकाणी ते दर्शवणारे फलक नसल्याने गतिरोधक दिसताच अचानक ब्रेक दाबल्यामुळे काम सुरू असलेल्या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील बाजारपेठेत NH 66 च्या चौपदरीकरणाच्या कामांतर्गत उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड उभारला जात आहे. या सर्व्हिस रोडवरून महामार्गावरील वाहने वेगाने जात असल्यामुळे आणि सर्व्हिस रोडची रुंदी कमी असल्यामुळे स्थानिकांनी बाजारपेठेतील या सर्व्हिस रोडवर गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. त्यानुसार महामार्गाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार कंपनीने तेथील सर्व्हिस रोडवर गतिरोधक टाकले आहेत. मात्र गतिरोधक दर्शवणारे फलक अथवा रस्त्यावर पांढरे पट्टे नसल्यामुळे समोर गतिरोधक दिसताच वेगात आलेली विशेषत: वाहने ब्रेक दाबल्यामुळे घसरण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
आरवली येथील राष्ट्रीय महामार्गावरती ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेता संबंधित ठेकेदार कंपनीने गतिरोधक उभारलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे तसेच गतिरोधक दर्शवणारे फलक तातडीने लावावे अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. महामार्ग प्राधिकरणाने या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स स्थानिकांसह वाहनधारकांनी केली आहे.