ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर आई द्रोणागिरी मातेचे मंदिर
उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी मातेचे मंदिर सुप्रसिद्ध आहे.’करंजा निवासिनी द्रोणागिरी माता,सुखी ठेवी सकल जनातेʼ असे वाक्य प्रत्येक करंजावासियांच्या मुखात नेहमीच असते.अश्या पुरातन काळापासून असलेल्या द्रोणागिरी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव २६ सप्टेंबरपासून मोठ्या भक्तीभावाने चालू झाला आहे.त्यामुळे येथे नऊ दिवस अखंड हरिनामाचा गजर घुमतो.अरबी समुद्राच्या कुशीत असलेले करंजा गाव आणि गावच्या पूर्वेकडे असलेले रामायणातील अख्यायिका असलेले पौराणिक द्रोणागिरी पर्वतावरील माता द्रोणागिरी मंदिर असे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे पर्यटकांना आपलेसे वाटते.मंदिरामध्ये द्रोणागिरी मातेसह आई शितलादेवी स्थानापन्न आहे.द्रोणागिरी मातेच्या पालखी उत्सवासह नवरात्रही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावेळी मंदीराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते.परंपरेनुसार नऊ दिवस अखंड भजन सप्ताह होतो याचे वैशिष्ट्य असे की नऊ दिवस मृदुंग, टाळ, चिपली नऊ दिवस जमिनीवर ठेवत नाही.तसेच दसऱ्याच्या दिवशी ग्रामस्थांकडून भंडाऱ्याचे महाप्रसाद ठेवण्यात येतो तेव्हा हजारोभाविक याचा लाभ घेतात.परंपरेनुसार सांयकाळी दसऱ्यादिवशी करंजावासिय सोने लुटण्याचा कार्यक्रम मंदिरासमोर करतात.
नवरात्रीच्या दिवसात रायगड, मुंबई, नवीमुंबई परिसरातील अनेक भाविक भेट देतात, देवीची ओटी भरण्यासाठी अनेक माहेरवासीनी, भक्त गण येतात तसेच प्रत्येक दिवशी अनेक भक्तजण भाविकांना प्रसादाची सोय करतात अशी माहिती देवीचे पुजारी जगन्नाथ म्हात्रे सांगितले तसेच उत्सव यशस्वी करण्यासाठी पंचकमिटी आणि ग्रामस्थ मेहनत घेतआहेत अशी माहिती चाणजेचे माजी सरपंच श्री मंगेश थळी यांनी दिली.