खाडीचे पाणी शिरल्याने विहिरीचे पाणी झाले खारे
रत्नागिरी तालुक्यात गावखडीतील प्रकार
रत्नागिरी : खाडीचे पाणी आतपर्यंत शिरल्याने तालुक्यात गावखडी ब्राह्मणवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
खाडीचे पाणी आत शिरल्यामुळे सर्व विहिरींचे पाणी खारे झाले असून ते पिण्यायोग्य राहिले नाही. गावखडी मधील खाडीतील पाणी आत येऊ नये म्हणून बांधण्यात आलेला बंधारा त्याची झडपे कुणी समाजकंटकांनी तोडल्याने हा प्रकार झाला आहे, ह्या आधी सुद्धा असे प्रकार झालेत पण तेव्हा ती झाकणे लावून प्रश्न मिटला होता, आता मात्र हो धोका वाढला आहे, ब्राह्मण वाडीतील एकही विहीर पाणी पिण्यासारखी राहिली नसून पूर्ण खाऱ्या पाण्याची विहीर झाली आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा झाला आहे. तरी प्रशासनाने वेळीच ह्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे असून लवकरात लवकर ह्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.