गणेशोत्सवासाठी नागपूर -मडगाव मार्गावर आणखी विशेष फेऱ्या
दि. १६ जुलैपासून आरक्षण
रत्नागिरी : नागपूर ते मडगाव दरम्यान धावणारी साप्ताहिक विशेष गाडी लिंगा 27 जुलैपासून कोकण रेल्वे मार्ग जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी कामानिमित्त राहणाऱ्या कोकणवासीयांच्या सोयीसाठी रेल्वेकडून विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.
नागपूर-मडगाव मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक विशेष गाडीच्या ( 01139 ) फेऱ्या दिनांक 27 व 30 जुलै, 3, 6, 10 ऑगस्ट, 14 17, 21, 24 आणि दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी होणार आहेत. ही विशेष गाडी नागपूर येथून सायंकाळी तीन वाजून पाच मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ती मडगावला पोहोचेल.परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी ( 01140 ) विशेष गाडी मडगाव येथून दिनांक 28 व 31 जुलै, दिनांक 4 ऑगस्ट, दिनांक 4, 7, 11 ऑगस्ट तर तर सप्टेंबर महिन्यात दिनांक 15, 18, 22, 25 तसेच 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही गाडी मडगाव येथून सायंकाळी सात वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता नागपूर स्टेशनला पोहोचेल.
ही गाडी संपूर्ण प्रवासात वर्धा जंक्शन, पुळगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी थिवी आणि करमाळी या स्टेशनवर थांबणार आहे.
आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक 16 जुलैपासून सुरु होणार आहे. ही गाडी 22 डब्यांची धावणार असल्याचे कोकण रेल्वेकडून कळविण्यात आले आहे