मावशीकडे सुट्टीसाठी आलेला युवक वहाळात बुडून मृत्यूमुखी
राजापुरात कोदवली येथील दुर्घटना
राजापूर : उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी आपल्या मावशीकडे लांजा तालुक्यातील वाकेड खालची भितळेवाडी येथील शुभम सीताराम भितळे (17)या तरूणाचा राजापूर तालुक्यातील कोदवली येथील वहाळात बुडून मृत्यू झाल्याची मंगळवारी सकाळी घडली.या दुर्घटनेने दोन्ही गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शुभम हा आपल्या वाकेड येथून काही कोदवली गावात आपल्या मावशीकडे आला होता. मंगळवारी सकाळी तो मित्रांसोबत कोदवली येथील वहाळावरील ओवळीची कोंड येथे स्नानासाठी गेला होता. पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला. या बाबत सोबतच्या तरूणांनी तत्काळ गावात माहिती दिली तर वाकेड येथील त्याच्या नातेवाईकांनाही कळविण्यात आले. त्या नंतर स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शुभम याला तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात आणले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी राजापूर पोलीसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल प्रमोद वाघाटे करत आहेत.