अरुण इंगवले यांना रत्नाकर कुलकर्णी स्मृती ‘मसाप’ शाखा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
२७ मे रोजी पुण्यात होणार वितरण
चिपळूण : येथील नामवंत कवी, बोलीभाषांचे अभ्यासक आणि समीक्षक अरुण इंगवले यांना महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठेचा रत्नाकर कुलकर्णी स्मृती ‘मसाप’ शाखा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार २७ मे रोजी पुण्यात एस. एम. जोशी सोशलिस्ट फाऊंडेशनच्या सभागृहात डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ‘मसाप’च्या ११६ व्या वर्धापन दिन समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
इंगवले यांच्या सहा एकांकिका, एक नाटक आणि २ कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ‘आबूट घेऱ्यातला सूर्य’ला आजपर्यंत १२ हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असून त्यांच्या एकांकिकांनाही ३ राज्य पुरस्कार मिळाले आहेत. कोकणातल्या तिल्लोरी बोलीवर त्यांचे संशोधन सुरु आहे. पुणे येथे २०१९ साली संपन्न झालेल्या ‘अखिल भारतीय श्री संत संताजी व संत साहित्य संमेलन’चे ते अध्यक्ष होते. पेडणे (गोवा) येथे झालेल्या गोमंतक साहित्य मंडळाच्या अखिल भारतीय संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्षही इंगवले होते. इंगवले हे गेल्या चार दशकांहून अधिक काळ काव्यलेखन करीत आहेत. इंगवलेंची कविता म्हणजे निवळ अभिव्यक्ती नाही, तर ते सध्याच्या काळावरचं अमूल्य चिंतन आहे. कवितासंग्रहाला प्रस्तावना लिहिताना प्रसिद्ध लेखक-समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या कवितेचं वर्णन ‘एकविसाव्या शतकावरील समर्थ भाष्य’ असं केलं आहे. ‘इंदोर’स्थित आपले वाचनालय आणि श्री सर्वोत्तम यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या अखिल भारतीय वसंत राशिनकर वार्षिक स्मृति सन्मानासाठीही इंगवले यांच्या ‘आबूट घेऱ्यातील सूर्य’ याच काव्य कलाकृतीची निवड करण्यात आली होती.
साप्ताहिक विवेकसमूह संचलित ‘विवेक साहित्य मंच’ने बोलीभाषेच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या कथालेखन स्पर्धेतही इंगवले यांनी लिहिलेल्या ‘कोंडीवरला बावा’ या कथेला सन्मानित करण्यात आले होते. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या साहित्य पुरस्कार समितीचे इंगवले हे प्रमुख आहेत. वाचनालयाचे हे पुरस्कार राज्यभर प्रतिष्ठेचे मानले जातात. तसेच कवीवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या देणगीतून चालविल्या जाणाऱ्या वाचनालयाचे मुखपत्र असलेल्या त्रैमासिक ‘मृदंगी’चे संपादनही तेच करत आहेत.