नागपूर : नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना मदतकार्यात उपयुक्त ठरू शकणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथे प्रकाशन झाले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर व अमरावती विभागातर्फे तात्काळ संदर्भासाठी ही आपत्ती व्यवस्थापन माहिती पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष बैठकीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला . त्यावेळी आपत्ती व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे , समीर मेघे प्रतिभा धानोरकर , पंकज भोयर तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांच्या संकल्पनेतून या पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली आहे. नागपूर अमरावती विभागाचे माहिती संचालक हेमराज बागूल यावेळी उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन दूरध्वनी पुस्तिकेमध्ये विदर्भातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासनातील पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच माध्यम प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी आणि सर्पमित्रांचे संपर्क क्रमांकाचा समावेश आहे. तसेच पावसाळ्यात नागरिकांनी घ्यावयाची काळजी, विजेपासून स्वत:चा जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासोबत विविध अनुषंगिक माहितीचा या दूरध्वनी पुस्तिकेमध्ये समावेश आहे.