आयकॉनिक सप्ताह निमित्त बुधवारी अग्रणी बँकेतर्फे ग्राहक जनसंपर्क अभियान
रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उपक्रम म्हणून 6 ते 12 जून दरम्यान देशात सर्वत्र आयकॉनिक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येथील अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या वतीने बुधवार 8 जून 2022 रोजी ग्राहक जनसंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील तसेच बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर संतोष सावंतदेसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचे उद्घाटन सकाळी 11 वाजता होईल अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एन.डी.पाटील यांनी दिली.
प्रधानमंत्री मुद्रा लोन, स्टँड अप इंडिया, स्वनिधी ऋण योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासह कृषी पतपुरवठा आणि बचत गटांना वित्त पुरवठा आदी संदर्भात आठवडाभर विशेष मोहिम राबविली जात आहे.
या कार्यक्रमादरम्यान बँकेतर्फे वित्त पुरवठा करण्यात आलेल्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना मंजूरी पत्रे तसेच मंजूर प्रकरणी धनोदशांचे वाटप या कार्यक्रमात होईल. प्रधानमंत्री मुद्रा लोन आणि स्वनिधी योजनेतील प्रलंबित अर्जांचा निपटारा सप्ताहानिमित्ताने गतीमान पध्दतीने करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
बुधवारी होणार्या या कार्यक्रमात कृषी वित्तपुरवठा मध्यम व लघु उद्योग क्षेत्र, विविध प्रकारच्या शासन पुरस्कृत योजना, नाबार्ड योजना समुद्री उत्पादने व वित्तीय बाबी आदी विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.