आ. निरंजन डावखरेंकडून रत्नागिरीला ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच राजापूर तालुक्यातील रुग्णांच्या सुविधेसाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून देण्यात आलेल्या ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत लोकार्पण करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका गरजेची होती. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांना मुंबई वा रत्नागिरीमध्ये हलविताना रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडत असे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदार व प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका देण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून रुग्णवाहिका तयार करण्यात आली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील `सागर’ बंगल्याबाहेर आज रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिका रत्नागिरीकडे रवाना झाली. या वेळी श्री. डावखरे, प्रमोद जठार, भाजपाचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव, सरचिटणीस अॅड. सुशांत पवार, मोहन घुमे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष श्रुती ताम्हणकर, सरचिटणीस अनुजा पवार, भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली आहे. लोकार्पण केलेली रुग्णवाहिका राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कार्यरत राहणार आहे. या रुग्णवाहिकेचा राजापूर तालुक्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज असलेल्या अत्यवस्थ रुग्णांना उपयोग होणार आहे.